esakal | वाहन लुटणारी आंतरराज्य टोळी जेरबंद..धुळे पोलिसांची कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

Gang Arrest Police

वाहन लुटणारी आंतरराज्य टोळी जेरबंद..धुळे पोलिसांची कामगिरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


धुळे : कंटेनरच्या अपहरणासह ७५ लाखांच्या मालाची विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी (Interstate gang)जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) (Dhule Local Crime Branch) सोमवारी (ता.३०) यश आले. तसेच टोळीतील चौघांच्या मुसक्याही आवळल्या. त्यांच्याकडून ६६ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हा न्यायालयाने संशयितांची तीन सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

हेही वाचा: धुळ्यात काडतुसांसह चार पिस्टल हस्तगत; राजस्थान कनेक्शन

कंटेनरचालक रामदास हरदयाल पाल (रा. कुरखा, ता. भरथना, जि. इटावा, उत्तर प्रदेश) याने १३ ऑगस्टला थाळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तो गौतमबुद्धनगर (उत्तरप्रदेश) येथून १६ जुलैला दहाचाकी कंटेनरने (एचआर ५५ एल ९००२) इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहनांचे स्पेअर पार्ट्स आदी साहित्य घेऊन दिल्लीमार्गे औरंगाबाद येथे निघाला. या दरम्यान त्याने पलवल (हरियाना) येथील महामार्गावरून एका व्यक्तीला बसविले. त्याला धुळे येथे यायचे होते. प्रवासादरम्यान त्या व्यक्तीने चालक रामदास याचा विश्‍वास संपादन केला. त्याने शिवपुरी (मध्य प्रदेश) येथे ढाब्यावर जेवण करताना कंटनेर चालकास कोल्ड्रींक्समधून न कळत गुंगीचे औषध दिले. रामदास याला गुंगी आली. त्या व्यक्तीने थाळनेर (ता. शिरपूर) पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर गोल्डन रिफायनरीसमोर कंटनेर आणून तेथे वाहनाची जीपीएस यंत्रणा खंडीत केली.


कंटेनर नवापूरमार्गे (जि. नंदुरबार) नेत वाहनातील ७५ लाख ७ हजार ९५० रुपयांचा माल एका ठिकाणी उतरवला आणि कंटेनरसह चालकास वापी- मुंबई रस्त्यावरील तलासरी (जि. पालघर) येथे सोडून दिले. चालक रामदास याला गुंगी उतरल्यानंतर तपासणीत कंटेनरमध्ये माल आढळला नाही. या प्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घडलेला हा प्रकार गंभीर असल्याने त्याचा छडा लावण्यासाठी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना सूचना केली.

हेही वाचा: फागणे-तरसोदचे काम सहा महिन्यांत होणार पूर्ण-नितीन गडकरी

हरिणानातून घेतले ताब्यात..

तपासादरम्यान निरीक्षक बुधवंत यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी व पथकाने पलवल (हरियाना) येथून जमेशद खान दिनू खान व आब्बास युसूफ खान यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत कंटेनरमधील मुद्देमाल सुरत (गुजरात) येथील शशिकांत उपाध्याय व अरुणकुमार पांडे यांच्याकडे ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार शोध पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी चोरीस गेलेल्या मालापैकी ६६ लाख ८२ हजार ६७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित जमेशद खान दिनू खान (रा. पिरगढी, ता. जि. पलवल), आब्बास युसूफ खान (रा. गौधोला, जि. नुह, हरियाना), शशिकांत धरणीधर उपाध्याय (रा. पांडेसरा, जि. सुरत, गुजरात) व अरूणकुमार रमाशंकर पांडे (रा. कडोदरा, सुरत, गुजरात) यांना सोमवारी (ता. ३०) अटक केली. सहभागी संशयितांच्या अन्य साथीदारांची विचारपूस सुरू आहे. पोलिस निरीक्षक बुधवंत, उपनिरीक्षक सूर्यवंशी, योगेश राऊत, हवालदार संजय पाटील, संदीप पाटील, कुणाल पानपाटील, संदीप सरग, रविकिरण राठोड, रवींद्र माळी, विशाल पाटील, सुनील पाटील, मनोज महाजन, मनोज बागूल आदींनी ही यशस्वी कारवाई केली.

loading image
go to top