esakal | बंगल्यातील सीसीटीव्हीची आधी दिशा बदलली; नंतर चोरांनी डाव साधला !
sakal

बोलून बातमी शोधा

बंगल्यातील सीसीटीव्हीची आधी दिशा बदलली; नंतर चोरांनी डाव साधला !

बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपले चेहरे कैद होणार नाही याची दक्षता चोरट्यांनी घेतली. त्यासाठी त्यांनी कॅमेऱ्याची दिशा बदलली. हातसफाईनंतर चोरटे मोराणे मार्गाकडील नाल्याच्या दिशेने पळाले.

बंगल्यातील सीसीटीव्हीची आधी दिशा बदलली; नंतर चोरांनी डाव साधला !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे  ः चोरीचा छडा लागू नये म्हणून बंगल्यातील सीसीटीव्हीची दिशा बदलत चोरट्यांनी कुंडाणे (वार, ता. धुळे) येथे दीड लाखाची रोकड आणि चांदी लंपास केली. शेतकऱ्याला बुधवारी (ता. २३) मध्यरात्रीनंतर चोरट्यांचा धाडसी प्रताप लक्षात आला. 

आवश्य वाचा ः  जागा बदलली अन घात झाला, क्लब मालकावर अजून कारवाई नाही 

धुळे शहरापासून जवळच कुंडाणे येथे शेतकरी योगेश पाटील यांचा बंगला आहे. ते जेवणानंतर आई- वडील, पत्नीसह आपापल्या खोलीत गेले. ही संधी साधत चोरट्यांनी पाटील यांच्या बंगल्यात हातसफाई केली. त्यांनी बंगल्या मागे असलेली संरक्षक जाळी कापून प्रवेश केला. मागच्या दरवाजाची कडी उघडत आतील लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. नंतर चोरट्यांनी कपाटातील दीड लाख रुपयांची रोकड, ८० भार वजनाच्या चांदीच्या वस्तू, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेत पोबारा केला. 

बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपले चेहरे कैद होणार नाही याची दक्षता चोरट्यांनी घेतली. त्यासाठी त्यांनी कॅमेऱ्याची दिशा बदलली. हातसफाईनंतर चोरटे मोराणे मार्गाकडील नाल्याच्या दिशेने पळाल्याचा अंदाज आहे. चोरीची घटना बुधवारी रात्री ११ ते १२ नंतर घडली असावी. मध्यरात्री शेतकरी पाटील यांचे वडील गोविंदराव यांना जाग आली. त्यांना मागील दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे त्यांनी घरातील सदस्यांना उठविले. त्यांनी पाहणी केली असता रोकड आणि दागिने लंपास झाल्याचे दिसले. माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, साहाय्यक निरीक्षक काळे, राजपूत, काझी, हवालदार मंगळे, ब्राम्हणे, मिस्तरी, पिंजारी, ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरटे माहितगार असावे, असा अंदाज व्यक्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे