लळींग धबधब्याच्या डोहात तीन युवकांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

एसडीआरएफच्या जवानांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. बचावकार्य सुरू असताना धबधब्यातून तीन युवकांचे मृतदेह हाती लागले. मृत तीनही युवकांची नावे अद्याप निष्पन्न झालेली नाहीत.

धुळे, : लळींग (ता. धुळे) येथील लांडोर बंगल्याजवळील धबधब्याच्या डोहात पोहण्यासाठी गेलेल्या शहरातील देवपूर भागातील तीन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली. या ठिकाणी सहा युवक पोहण्यासाठी गेले होते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, मोहाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संगीता राऊत पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. एसडीआरएफच्या जवानांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. बचावकार्य सुरू असताना धबधब्यातून तीन युवकांचे मृतदेह हाती लागले. मृत तीनही युवकांची नावे अद्याप निष्पन्न झालेली नाहीत. लळींग येथील धबधब्यात पावसाळ्यात पोहण्यासाठी अनेक तरुण जात असतात. यापूर्वीही पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याचे घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथे सुरक्षेची व्यवस्था करण्याची वेळोवेळी मागणी होते, मात्र दुर्घटनेनंतर अशा उपाययोजनांचा प्रश्‍न थंड बस्त्यात जातो. लळींग हे पर्यटनस्थळ असल्याने येथे धुळ्यासह परिसरातील पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. पावसाळ्यात येथील धबधबा वाहता झाल्यानंतर तेथील विहंगमदृश्‍य पाहण्यासाठी पर्यटक जात असतात. त्यातच काही तरुणांना पोहण्याचा मोह आवरत नाही. धबधब्याचा डोह खोल असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे येथे दुर्घटना घडतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule in laling dhabdhaba three young boys died during swimming