esakal | धुळे महापौरांचे चोख प्रत्युत्तर, वल्गना न करता रेमडेसिव्हिरचे वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे महापौरांचे चोख प्रत्युत्तर, वल्गना न करता रेमडेसिव्हिरचे वाटप

धुळे महापौरांचे चोख प्रत्युत्तर, वल्गना न करता रेमडेसिव्हिरचे वाटप

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : कोरोनाग्रस्तांना निकषानुसार आवश्‍यक ठरणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनप्रश्‍नी केवळ वल्गना, पत्रकबाजी, टीकाटिप्पणी न करता महापालिकेने कृतीवर भर दिला आहे. यात महापालिकेला पहिल्या टप्प्यात चारशे, तर दुसऱ्या टप्प्यात अकराशे इंजेक्शन प्राप्त झाले. त्याचे गरजूंना वाटप सुरू असल्याचे महापौर चंद्रकांत सोनार यांनी सांगितले.

हेही वाचा: कमी रुग्णसंख्येत धुळे जिल्हा प्रथम..कोरोनावर राजकारण नको !

महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. तसेच भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे, शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी इंजेक्शन आणत गरजूंना उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी आणि भाजपमध्ये विविध मुद्यांवरून राजकारण होत आहे. त्यात रेमडेसिव्हिर वाटपाचा मुद्दा अग्रस्थानी आहे. या पार्श्वभूमीवर महापौर सोनार यांनी भूमिका मांडताना सांगितले, की महापालिका क्षेत्रात गेल्या दिवसांपासून शासनामार्फत रेमडेसिव्हिरचा पुरवठा झालेला नाही. खडतर स्थितीत आणि गरजूंना इंजेक्शनसाठी वणवण करावी लागत असताना महापालिकेने इंजेक्शनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तो फलदायी ठरला आहे.

रुग्णांसाठी संजीवनी

महापालिकेच्या निर्णयामुळे गरजू रुग्णांना इंजेक्शन मिळते आहे. याकामी भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, तसेच भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने शहरातील रुग्णांची गरज ओळखून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा होत असलेला पुरवठा संजीवनी ठरत आहे. महापालिकेचे आयुक्त‍ अजीज शेख यांनी ही सकारात्मक भूमिका घेत केलेली तातडीची कार्यवाही अभिनंदनीय आहे.

हेही वाचा: धुळे जिल्ह्यात चौदा ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प

शासकीय पुरवठा नाही

महापालिकेला पहिल्या टप्प्यात महापालिकेस चारशे, तर दुसऱ्या टप्प्यात अकराशे इंजेक्शन प्राप्त झाले. ते पारदर्शकतेने रुग्णांपर्यंत पोचविण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत शासनाकडून दोन दिवसांपासून इंजेक्शनचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला असताना महापालिकेमार्फत होणारा पुरवठा रुग्णांना दिलासादायक ठरला आहे. या कार्यात अतिरिक्त आयुक्‍त गणेश गिरी, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, औषधनिर्माता संजय गुजर व अन्य अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत.

श्रेय वादाला खतपाणी नको

कोणतीही कृती न करता केवळ पत्रकबाजी व श्रेय वादाचे राजकारण करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना हे एक चोख उत्तर आहे. केवळ टीका व पत्रकबाजी करण्यापेक्षा जनतेसाठी आपण प्रत्यक्षात काय कृती करू शकतो याचे उत्तम उदाहरण महापालिकेतर्फे समोर आले आहे. महापालिका आणि भाजपच्या सहकार्याने नागरिकांना मिळणारी ही मदत समाधानाची ठरत आहे. केवळ वल्गना न करता प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यामुळे जनतेसमोर वस्तुस्थिती स्पष्ट झाल्याचे महापौर सोनार यांनी नमूद केले.

loading image