जीवनदान देणाऱ्या मानलेल्या काकाला तीन वर्षांनी मारली मिठी !  

एल. बी. चौधरी
Monday, 26 October 2020

आपल्या एकुुलत्या लाडक्या लेकराच्या आजारपणामुळे आई वडिलांना त्याचा पहिला व दुसरा वाढदिवसही साजरा करता आला नव्हता. शस्त्रक्रियेसाठी चार लाख रुपये खर्च लागेल असे ऐकताच दोघांना रडूच कोसळले.

सोनगीर : पहिला वाढदिवसानंतर तीन वर्षांनी मानलेल्या काकांची रविवारी (ता. 25) भेट घेतल्यानंतर मुलाने त्यांना पाहून धावतच मिठी मारली. जणू काही तो त्याला जीवदान देणाऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत होता. आणि त्याप्रसंगी मागील आठवणी ताज्या होऊन उपस्थित सर्व जण भावविभोर झाले. 

आवश्य वाचा- दोन वर्षाची बालीका तिसऱ्या मजल्यावरून पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचली ! 

धमाणे ता. धुळे येथील चेतन पुंडलिक पाटील याच्या हृदय व वाॅलला जन्मता दोन ठिकाणी छिद्र होते. तो दहा महिन्याचा असतांना माता - पित्याच्या लक्षात ही बाब आली. मग सुरू झाले दवाखाना, लॅब व औषधालयाच्या चकरा. आपल्या एकुुलत्या लाडक्या लेकराच्या आजारपणामुळे आई वडिलांना त्याचा पहिला व दुसरा वाढदिवसही साजरा करता आला नव्हता. शस्त्रक्रियेसाठी चार लाख रुपये खर्च लागेल असे ऐकताच दोघांना रडूच कोसळले. येथील रुग्णमित्र व दलित मित्र दिलीप सुका माळी यांनी त्यांना जीवनदायी योजनेंतर्गत व सामाजिक संस्थांकडून मदत मिळवून दिली. चेतनला जीवदान मिळाले. आजारपणातून बाहेर पडल्यानंतर त्याचा तिसरा परंतु पहिल्यांदाच वाढदिवस मार्च 2017 मध्ये दिलीप माळी यांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्याला त्याच्या सर्व नातेवाईक व प्रतिष्ठितांनी आनंदाश्रू गाळत शुभेच्छा दिल्या होत्या.

 

जीवनदायी योजनेत केवळ दीड लाख रुपये मिळण्याची तरतूद असल्याने उर्वरित रक्कम सामाजिक संस्थेमार्फत मिळविण्यात आली होती. हळूहळू चेतनची आजारपणातून पूर्ण मुक्तता झाली. तीन वर्षांत वाढदिवस साजरा करण्याची परंपरा पाळत मार्च 2020 मध्ये त्याचा सहावा पण प्रत्यक्ष दुसऱ्यांदा वाढदिवस साजरा झाला. पण कोरोनामुळे त्यानेे मानलेल्या काका दिलीप माळींना उपस्थित राहता आले नाही. मुलाच्या आग्रहाखातर आई वडील चेतनला रविवारी श्री. माळी यांचेकडे घेऊन आले. चेतनचे गुुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule met uncle helped sick three years later