
रोजगारनिर्मितीसह शेतकरी समृद्ध होऊ शकेल. सद्यःस्थितीत अवधान शिवारातील विकसित एमआयडीसीत भूखंड (प्लॉट) शिल्लक नाहीत.
धुळे ः विनम्र, मितभाषी स्वभावामुळे जिल्ह्यात वेगळी छाप पाडणारे जिल्हाधिकारी संजय यादव यांना कृषिप्रधान धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळावी, असे वाटत आहे. त्यासाठी धुळे शहरालगत सरासरी २७९, तर साक्रीत सरासरी २७३ हेक्टर सरकारी जागेत औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) साकारण्याचे प्राथमिक नियोजन श्री. यादव करीत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उद्योगमित्र समितीच्या बैठकीत त्यांनी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या प्रश्नाला स्पर्श केला.
आवश्य वाचा- दिलासादायक; नंदूरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ कोटींची मदत
जिल्हाधिकारी कार्यालयात २३ महिन्यांनंतर उद्योगमित्र समितीची बैठक झाली. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यादव अध्यक्षस्थानी होते. अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक मनोजकुमार दास, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी, प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, प्रशिक्षणार्थी महाव्यवस्थापक अमोल इंगळे, खानदेश औद्योगिक विकास परिषदेचे प्रवर्तक नितीन बंग, खानदेश इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट असोसिएशनचे सचिव भरत अग्रवाल, धुळे- अवधान मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे नितीन देवरे, भाजप उद्योग आघाडीचे संजय बागूल, राहुल मुंदडा, उमेश अग्रवाल आदी उपस्थित होते.
यादव यांचा मनोदय
जिल्हाधिकारी यादव पूर्वी ‘एमआयडीसी’चे उपमुख्य कार्यकारी अधिकारीही होते. त्या अनुभवासह मंत्रालयातील सेवेचा लाभ धुळे जिल्ह्याच्या कृषी आणि औद्योगिक विकासाला मिळावा, असे त्यांना वाटते. जिल्ह्यातील कृषीक्षेत्र औद्योगिक क्षेत्राशी जोडले, तर रोजगारनिर्मितीसह शेतकरी समृद्ध होऊ शकेल. सद्यःस्थितीत अवधान शिवारातील विकसित एमआयडीसीत भूखंड (प्लॉट) शिल्लक नाहीत. त्यामुळे अतिरिक्त औद्योगिक वसाहत विकसित करावी लागेल. त्यासाठी लगतच्या रावेर शिवारातील सरकारी ६५० पैकी २७९ हेक्टर जमीन हस्तांतरित करावी लागेल. यादृष्टीने जिल्हाधिकारी यादव यांनी पूर्व हालचाली सुरू केल्या. तसेच साक्री येथे सरासरी २७३ हेक्टर सरकारी जागेवर एमआयडीसी विकसित करण्याचा त्यांचा मनोदय आहे.
साक्रीत जागेसाठी प्रयत्न
बैठकीत जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की जिल्ह्यात मुबलक पाणी, कृषी उत्पादन, दळणवळणाची साधने आहेत. या स्थितीत औद्योगिक विकास महामंडळाने या क्षेत्राच्या विकासाचा कृती आराखडा तयार करून सादर करावा. साक्री तालुक्यात कृषी आधारित प्रक्रिया उद्योगांसाठी औद्योगिक महामंडळाचे क्षेत्र उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहेत. गोंदूर विमानतळाचे सक्षमीकरण, लॉजिस्टिक हबच्या निर्मितीसाठी पडताळणी केली जात आहे. अवधान शिवारातील एमआयडीसीत अग्निशमन दल कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असेल.
वाचा- शिंदखेडा तालुक्यातील तिन्ही कापूस केंद्र बेमुदत बंद ! -
अवधान शिवारातील औद्योगिक वसाहतीत वीजजोडणी तत्काळ मिळावी, यांसह प्लॉट विक्री, अतिक्रमण, पाणी, पथदिवे आदी समस्या सोडवाव्यात, अशी मागणी समिती सदस्य तथा उद्योजकांनी केली.
संपादन- भूषण श्रीखंडे