esakal | मिंड खूनप्रकरणी २२ गुन्हेगारांना ‘मोक्का’ 
sakal

बोलून बातमी शोधा

mind murder case

टोलनाका परिसरात भरदुपारी साडेतीननंतर घडलेल्या थरारक घटनेत टोळीप्रमुख अतुल कोळीसह २६ मारेकऱ्यांनी पिस्तूल, तलवारी, चाकू, इतर घातक शस्त्रांचा वापर केला.

मिंड खूनप्रकरणी २२ गुन्हेगारांना ‘मोक्का’ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग टोलनाका परिसरात १८ जुलैला झालेल्या सशस्त्र हल्ल्यात हॉटेल महाकालचा मालक राहुल मिंडचा निर्घृण खून झाला. या प्रकरणी गुन्ह्यातील २२ संशयितांना ‘मोक्का’ लावण्याचे कठोर आणि स्वागतार्ह पाऊल जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी उचलले आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगताचे धाबे दणाणले आहे. यात चार संशयित अल्पवयीन असल्याने त्यांना ‘मोक्का’ लावण्याची परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत २१ संशयितांना अटक केली, असून एक फरारी आहे. 
टोलनाका परिसरात भरदुपारी साडेतीननंतर घडलेल्या थरारक घटनेत टोळीप्रमुख अतुल कोळीसह २६ मारेकऱ्यांनी पिस्तूल, तलवारी, चाकू, इतर घातक शस्त्रांचा वापर केला. ते सशस्त्र चाल करून येत असल्याचे पाहून राहुल मिंड व साथीदार हॉटेलमधून पळू लागले. त्या वेळी नाल्यालगत पडल्यानंतर मारेकऱ्यांनी हत्यारांनी सपासप वार करत राहुलचा खून केला. दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला. नंतर ते संशयित घटनास्थळावरून वाहनांतून पसार झाले. या प्रकरणी २६ मारेकऱ्यांविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर चार अल्पवयीन वगळता २२ संशयितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई झाली आहे. 

धुळ्यात ‘मोक्का’ न्यायालय 
धुळे जिल्हा न्यायालयात विशेष ‘मोक्का’ न्यायालय चालविण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अशी प्रकरणे आता नाशिकच्या ‘मोक्का’ न्यायालयात वर्ग होणार नाहीत. धुळे जिल्हा न्यायालयात ‘मोक्का’चे खटले चालविण्यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक १ आणि जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक २ यांची नियुक्ती झाली आहे. अशा एकूण खटल्यांपैकी निम्मे-निम्मे खटले दोन न्यायाधीशांपुढे चालतील. सद्यःस्थितीत या पदांवर न्यायाधीश शैलेश उगले आणि न्यायाधीश ए. बी. क्षीरसागर कार्यरत आहेत. तसेच सरकारने जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर, सहाय्यक जिल्हा सरकारी वकील पराग पाटील, सहाय्यक सरकारी वकील गणेश पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणूनही नियुक्ती केली आहे. सद्यःस्थितीत राहुल मिंड खून प्रकरणी ॲड. पराग पाटील काम पाहत आहेत. 

या २२ गुन्हेगारांना ‘मोक्का’ 
टोळीप्रमुख अतुल ऊर्फ कालू निंबाजी कोळी (वय २२, रा. दंडेवालाबाबानगर, मोहाडी), चँपियनसिंग मिलनसिंग भादा (१९, रा. वनश्री कॉलनी, मोहाडी), अक्षय संजय चौगुले (२६, रा. पवननगर, पश्‍चिम हुडको, चाळीसगाव रोड), अजय उत्तम भंडारे (२६, रा. तिखी रोड, मोहाडी), महेंद्र शरद कोकणे (२४, रा. मोहाडी), अविराज प्रकाश सोनवणे (२३, रा. शिवानंद कॉलनी, म्हाडा वसाहत, मोहाडी), गणेश अर्जुन सोनवणे ऊर्फ गण्या ऊर्फ डमऱ्या (२४), अजय ऊर्फ आबा लक्ष्मण कोळी (२०), सुनील रमेश जाधव (२३), अक्षय संजय हाके (२५), हेमंत ऊर्फ विकी संजय हाके (२६), करण अर्जुन सोनवणे (२३), आकाश नाना कोळी (२८), दीपक राजू कोळी (२२), संजय ऊर्फ सनी राजेंद्र थोरात (२४), राहुल विनायक बाविस्कर (२१), मिनाल ऊर्फ मोहित जितेंद्र मनहास (१९), किशोर ऊर्फ आप्पा गुलाब पाटील (२२), सागर मुरलीधर चौगुले (३०), तुषार ऊर्फ सागर प्रकाश सावळे (कोळी, वय २१), ज्ञानेश्‍वर ऊर्फ केण्या हिंमत कढरे (रा. सर्व मोहाडी). अन्य एक फरारी. 
 
मिंड खून प्रकरणातील संशयितांचे रेकॉर्ड तपासले. त्यांच्यावर आधीच काही गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले. संशयितांनी भरदिवसा सशस्त्र गुन्हा घडविला. तो गांभीर्याने घेतला. त्यामुळे त्यांच्यावर ‘मोक्का’ची कारवाई केली. अशा टोळीची आणि टोळी बनू पाहणाऱ्यांची गुन्हेगारी, दहशत मोडीत काढणे, ‘मोक्का’अंतर्गत कारवाई होऊ शकते. तसेच कठोर कारवाईचे उदाहरण डोळ्यासमोर राहण्यासाठी पावले उचलली. 
- चिन्मय पंडित, जिल्हा पोलिस अधीक्षक, धुळे