हद्दवाढ क्षेत्राच्या विकासासाठी नवीन प्रस्ताव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

धुळे : हद्दवाढ क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या अनुषंगाने हद्दवाढ क्षेत्रातील नगरसेवकांकडून त्या-त्या भागातील कामे मागविण्यात येत आहेत. या कामांची निकड त्या-त्या भागातील अभियंत्यांकडून तपासली जात आहे. कामांची ही यादी अंतिम झाल्यानंतर निधीसाठी हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 

धुळे : हद्दवाढ क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या अनुषंगाने हद्दवाढ क्षेत्रातील नगरसेवकांकडून त्या-त्या भागातील कामे मागविण्यात येत आहेत. या कामांची निकड त्या-त्या भागातील अभियंत्यांकडून तपासली जात आहे. कामांची ही यादी अंतिम झाल्यानंतर निधीसाठी हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 

दोन वर्षापूर्वी अर्थात 5 जानेवारी 2018 ला महापालिकेची हद्दवाढ झाली. याद्वारे वलवाडी, महिंदळे, बाळापूर, पिंप्री ही संपूर्ण गावे गावठाणासह भोकर, नकाणे, अवधान, चितोड, वरखेडी, मोराणे या सहा महसुली गावांचे गावठाणासह काही क्षेत्र व नगावचे गावठाणाशिवाय क्षेत्र धुळे महापालिका क्षेत्रात आले आहे. त्यामुळे पूर्वीच्या 54.62 चौरस किलोमीटर वरून महापालिकेचे क्षेत्रफळ आता 101.08 चौरस किलोमीटर झाले आहे. हद्दवाढ क्षेत्राच्या विकासासाठी मात्र शासनाकडून निधी मिळालेला नाही, त्यामुळे हद्दवाढ क्षेत्र विकासापासून वंचित आहे. शहराचा भाग बनलेला या भागात मूलभूत सोयी-सुविधांचीही वानवा आहे. त्यामुळे निधी मिळावा शहराच्या अनुषंगाने विकास व्हावा अशी या भागातील नगरसेवक, नागरिकांची अपेक्षा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने निधी मिळत नाही. 

आता नव्याने प्रस्ताव 
हद्दवाढ झाल्यानंतर महापालिकेने हद्दवाढ क्षेत्रात रस्ते, गटारी, सार्वजनिक शौचालये, संरक्षक भिंती, विद्युत पोल, पथदिवे आदी कामांसाठी 349 कोटी 38 लाख 43 हजार 289 रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी 22 फेब्रुवारी 2018 ला स्थायी समितीने मंजुरीही दिली होती. दरम्यान, त्यानंतर 150 कोटींची कामे सुचविण्याबाबतही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, या कामांबाबत मतभेद झाल्याने हा विषय पुढे सरकला नाही. या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख यांच्या उपस्थितीत हद्दवाढ क्षेत्रातील नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत हद्दवाढ क्षेत्रातील नगरसेवकांनीच त्यांच्या भागातील कामे सुचवावीत असे ठरले. नगरसेवक जी कामे सुचवतील त्या कामांच्या आवश्‍यकतेबाबत त्या-त्या भागातील अभियंत्यांनी तपासणी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. ही सर्व कामे अंतिम झाल्यानंतर निधीसाठी एकत्रित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 

एक कोटीची कामे सुचवा 
दरम्यान, जिल्हास्तर नगरोत्थान योजनेंतर्गत महापालिकेकडून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागातून एक कोटी रुपयांची कामे सुचविण्याबाबत नगरसेवकांना सांगण्यात आले आहे. प्रभागातील चारही नगरसेवकांनी एकत्रित कामांची यादी द्यायची आहे. त्यासाठी नगरसेवकांकडून कामांची यादी सादर करण्याची लगबग सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule muncipal corporation city aria devlopment