धुळ्यात मनपा प्रशासनाचे कौतुक, पाणीप्रश्‍नी वाभाडे

रमाकांत घोडराज
Wednesday, 10 June 2020

प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे ओव्हरसियर, व्हॉल्व्हमन यांनी वेळीच तक्रारींवर कार्यवाही न केल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याचा ठपका महापौर सोनार यांनी ठेवला. दरम्यान, यापुढे कोणत्याही स्वरूपाची हलगर्जी व दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. अक्कलपाडा योजनेचे काम वर्षभरात पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करणे शक्‍य होईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले. 
 
 

धुळे ः शहरात विविध उपाययोजना करून कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्‍यात ठेवण्यासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या प्रशासनाच्या पाठीवर महापालिकेच्या विशेष महासभेत आज कौतुकाची थाप पडली. मात्र, याच कौतुकपात्र अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शहरातील अनियमित पाणीप्रश्‍नावरून अकार्यक्षमता, हलगर्जीपणाचा शिक्काही बसला. पाणीप्रश्‍नी यापुढे हलगर्जी, दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा इशारा महापौरांनी दिला. 
 
"कोरोना'मुळे फिजिकल डिन्स्टन्सिंगचा निकष पाळण्यासाठी महापालिकेची विशेष महासभा राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात झाली. महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. विविध चर्चेत सभापती सुनील बैसाणे, विरोधी पक्ष नेते साबीर शेख, सदस्य प्रदीप कर्पे, शीतल नवले, अमोल मासुळे, हर्ष रेलन, अमीन पटेल, प्रतिभा चौधरी, वंदना भामरे, हिरामण गवळी, संतोष खताळ, उमेर अन्सारी आदींनी भाग घेतला. 
 
अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक 
कोरोना विषाणूचा संसर्ग शहरात सुरवात होण्यापूर्वीपासून कोरोना रोखण्यासाठी महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी करत असलेल्या कामाचे सर्वच सदस्यांनी कौतुक केले. आयुक्त शेख यांनी या लढाईत जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, राजकीय पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक संस्थांचे योगदान असल्याचे सांगितले. 
 
पाणीप्रश्‍नी मात्र वाभाडेच... 
सभापती सुनील बैसाणे यांनी पाण्यासाठी नागरिकांवर गुन्हा दाखल झाल्याचा मुद्दा मांडत, त्यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी केली. पाण्याच्या समस्येमुळे नगरसेवकांना प्रभागात फिरता येत नाही, असेही ते म्हणाले. शितल नवले यांनी उपाययोजना सुचवूनही कार्यवाही झाली नसल्याची खंत व्यक्त केली. अभियंता कैलास शिंदे यांना उद्देशून साहेब...जाता- जाता (निवृत्तीपूर्वी) पाणीप्रश्‍न सोडवून जा, अशी कोपरखळीही मारली. प्रतिभा चौधरी यांनी तर घसा कोरडा करूनही समस्या सुटली नाही, जलकुंभ उशाला आणि कोरड घशाला, असा प्रकार असल्याचे संतापात सांगितले. हर्षकुमार रेलन यांनी मनुष्यबळ वाढविण्याची मागणी केली. अमोल मासुळे यांनी मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ कनेक्‍शन, नवीन जलकुंभ कार्यान्वित न होण्याचा मुद्दा मांडला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule municipal corporation special meeting