धुळे मनपा स्थायी सभेत नगररचनाच्या अधिकाऱ्यांचे काढले ‘वाभाडे’! 

रमाकांत घोडराज
Thursday, 27 August 2020

बांधकाम परवानगीसाठी संबंधित व्यक्ती जोपर्यंत संपर्क साधत नाहीत, तोपर्यंत त्रुटी निघत राहतात. संपर्क साधला की फाइल मंजूर होते.

धुळेः महापालिकेच्या ऑनलाइन स्थायी समिती सभेत गुरुवारी (ता. २७) भूखंड विक्री प्रकरणासह एकूण कार्यपद्धतीवर सभापतींसह काही नगरसेवकांनी गंभीर आरोप करून महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले. उपायुक्त शांताराम गोसावी यांच्यावरही एका प्रकरणात एका सदस्याने गंभीर आरोप केल्याने श्री. गोसावी यांचा पारा चढला होता. दरम्यान, सभापती सुनील बैसाणे यांनी नगररचना विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसांत खातेंतर्गत बदल्या झाल्या पाहिजेत, असा आदेश आस्थापना विभागाला दिला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी दुपारी साडेचारला ऑनलाइन घेण्यात आली. महापालिकेच्या सभागृहात सभापती बैसाणे, उपायुक्त गोसावी, नगरसचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते. समितीचे सदस्य, अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. सदस्य नंदू सोनार यांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केला. अभियंते प्रकाश सोनवणे, कमलेश सोनवणे यांचे थेट नाव घेत त्यांनी या अधिकाऱ्यांना बांधकाम परवानगीपेक्षा ले-आउटच्या कामातच जास्त इंटरेस्ट असतो, असा आरोप केला. 
 

...मग काय घ्यायचे ते घेतात 
बांधकाम परवानगीसाठी संबंधित व्यक्ती जोपर्यंत संपर्क साधत नाहीत, तोपर्यंत त्रुटी निघत राहतात. संपर्क साधला की फाइल मंजूर होते, असे श्री. बैसाणे म्हणाले, तर ही मंडळी काय घ्यायचे ते घेतात, असा थेट आरोप श्री. सोनार यांनी केला. सदस्य अमोल मासुळे यांनीही अधिकाऱ्यांना ले-आउटमध्येच जास्त इंटरेस्ट असल्याचे म्हणत २०१५ ते २०२० दरम्यान किती ले-आउट मंजूर झाले त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी केली. 

भूखंड प्रकरणात लेखी द्या 
महापालिकेच्या भूखंड प्रकरणात किशोर बाफना यांनी गुरुवारी (ता. २७) खुलासा प्रसिद्ध करून एक प्रकारे महापालिकेवरच आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात उपायुक्त, नगररचनाकार महेंद्र परदेशी व संजय बहाळकर यांनी काय-काय निर्णय घेतले त्याची लेखी माहिती सादर करावी, असा आदेशही श्री. बैसाणे यांनी दिला. 

गोसावींवर गंभीर आरोप 
जलशुद्धीकरण केंद्रावर केमिस्ट नियुक्तीच्या प्रकरणात पात्र उमेदवाराला अपात्र व अपात्र उमेदवाराला पात्र ठरविल्याचा नगरसेवक संजय पाटील यांच्या आरोपांचा दाखला देत सदस्य श्री. मासुळे यांनी श्री. गोसावी यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा थेट आरोप केला. त्यामुळे श्री. गोसावी अस्वस्थ झाले होते. आपल्या २० वर्षांच्या सेवेत असा आरोप झाला नाही. केमिस्ट नियुक्तीची प्रक्रिया समितीने केली आहे यात एक टक्काही माझी चूक असेल तर शिक्षा भोगायला तयार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, गेल्या २० वर्षांच्या कामाचा दाखला श्री. गोसावी देतात, मग या २० वर्षांत आपल्यावर किती कारवाया झाल्या, कुणावर ॲन्टिकरप्शनची कारवाई झाली तेही सांगा, असा पलटवार श्री. मासुळे यांनी केल्याने श्री. गोसावी अधिकच अस्वस्थ झाले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Dhule Municipal Corporation Standing Committee meeting, members of the town planning department displeased with the work