esakal | अनेक प्रश्‍न अनुत्तरित, पोलिसांचा कंबर कसून तपास तरी निष्पाप प्राचीच्या हत्येचे गूढ कायम ! 
sakal

बोलून बातमी शोधा

अनेक प्रश्‍न अनुत्तरित, पोलिसांचा कंबर कसून तपास तरी निष्पाप प्राचीच्या हत्येचे गूढ कायम ! 

जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दुचाकीवरून बालिकेच्या निवासस्थानापासून घटनास्थळापर्यंतची पाहणी केली आहे. 

अनेक प्रश्‍न अनुत्तरित, पोलिसांचा कंबर कसून तपास तरी निष्पाप प्राचीच्या हत्येचे गूढ कायम ! 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः निमगूळ (ता. धुळे) येथील दोनवर्षीय बालिका प्राची महाजन (माळी) हिची विहिरीत फेकून हत्या झाली. पोलिसांकडून मारेकऱ्यांचा अहोरात्र कंबर कसून शोध सुरू आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी २५ हजार, तर खासदारांनी २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, पोलिसांच्या हाती अद्याप धागेदोरे लागलेले नाहीत. घटनेनंतर अनेक प्रश्‍न अनुत्तरित आहेत. त्याची उकल सुरू आहे. 

आवश्य वाचा- साक्री पश्चीम पट्टयात पिकतोय मणिपूरचा प्रसिद्ध काळभात ! -

पोलिस यंत्रणेच्या वरिष्ठ पातळीवर ही घटना गांभीर्याने घेतली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दुचाकीवरून बालिकेच्या निवासस्थानापासून घटनास्थळापर्यंतची पाहणी केली आहे. 

नेमके काय घडले? 
निमगूळ येथील शेतकरी प्रवीण रामराव महाजन पत्नी पूजासह गावाच्या शेवटच्या टोकाला शेतशिवारात नवीन वस्तीत वास्तव्यास आहेत. त्यांना ऋषी (वय ५), मुलगी प्राची अशी दोन अपत्ये. त्यांच्याच लहान आकाराच्या घरात मध्यभागी कमान बांधून दुसऱ्या बाजूला त्यांची आई व लहान भाऊ अनिल पत्नी मोनालीसह राहतात. उकाड्यामुळे ते घराचा मुख्य दरवाजा बंद न करता आतून खाट लावतात. खाट लोखंडी पलंगाला बांधून ठेवतात. याच पद्धतीने १७ ऑक्टोबरला प्रवीण महाजन यांचे कुटुंबीय झोपले असताना, आईच्या कुशीत असलेली प्राची रात्री साडेअकराला वडिलांना जाग आल्यावर दिसली नाही. त्यांनी शोधाशोध केली. नंतर १८ ला सकाळी नऊच्या सुमारास वेल्हाणे-निमगूळ शिवारातील विहिरीत एका पावरा कुटुंबाला निष्पाप प्राचीचा मृतदेह तरंगताना आढळला. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त झाला. 

अनेक प्रश्‍न अनुत्तरित 
प्राचीचा मृतदेह ज्या विहिरीत आढळला ती कठड्याची विहीर महाजन यांच्या घरापासून गावातून गेल्यास सरासरी साडेपाच किलोमीटरवर, तर दुसऱ्या मार्गाने साडेतीन किलोमीटरवर आहे. त्यासाठी नदी ओलांडून जावे लागते. या मार्गादरम्यान सरासरी १५ ते १७ विहिरी आहेत. मारेकऱ्याने प्राचीला घरातून नेले तेव्हा ती रडली होती की नाही? मारेकऱ्याने प्राचीची हत्या दूर अंतरावरील विहिरीत फेकून का केली? मारेकरी दुचाकीने गेला असेल, तर प्राचीला धरण्यासाठी आणखी एखादा साथीदार होता का? तो गावातून गेला असेल, तर प्राचीच्या रडण्याचा आवाज आला नसेल का? प्राची रडली नसेल तर मारेकरी तिच्या परिचित होते का? रात्री अकरानंतर मारेकऱ्याने प्राचीला नेले असेल तेव्हा गावात कुणीच जागे नव्हते का, अशा अनेक गंभीर प्रश्‍नांची उकल करण्यात पोलिस यंत्रणा जुंपली आहे. मारेकऱ्याने प्राचीला विहिरीत फेकून दिल्यानंतर जिवाच्या आकांताने तिने हाताच्या मुठी आवळलेल्या होत्या. तशा अवस्थेत तिचे चेहऱ्याकडील शरीर पाण्यात, पाठीचा भाग तरंगत होता. 

वाचा- टोलप्लाझाचा अजब तर्क; अपघाताचे खापर फोडले फुलझाडांवर आणि केली कत्तल !

काय घडू शकते? 
ज्याला संतती नाही, त्याने नरबळी दिला तर संतती प्राप्त होते, तसेच धनप्राप्तीसाठीही नरबळी देण्याची अंधश्रद्धा ग्रामीण भागात डोके वर काढत असते. त्यातून प्राचीची हत्या तर झाली नाही ना, अशी शक्यता पोलिस पडताळत आहेत. घटनेची उकल आणि नि‍ष्पाप प्राचीला न्याय मिळण्यासाठी पोलिस तपासात कुठलाही कसूर ठेवत नसल्याचे दिसून येते. हे आव्हान मानून पोलिस अधीक्षक पंडित, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, तालुक्याचे निरीक्षक हेमंत पाटील तपास करीत आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे