काँग्रेस भवन ताब्यात घ्या !

रमाकांत घोडराज
Friday, 11 December 2020

काँग्रेस भवन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. या भागात वाहतुकीची कोंडीही होते. त्यामुळे अतिक्रमण झाले असेल, तर ते काढून रस्ता रुंद करता येईल.

धुळे ः महापालिकेच्या मालकीच्या ज्या जागांचे करार संपले आहेत, त्या जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी. त्याची सुरवात शहरातील बारापत्थर रोडवरील काँग्रेस भवनापासून करावी, असा आदेश महापालिका स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी गुरुवारी स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांना दिला. श्री. बैसाणे याच्या या आदेशाचे राजकीय पटलावर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

वाचा- कृषी विद्यालयातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ 
 

महापालिकेची स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी महापालिकेच्या सभागृहात झाली. काही महिन्यांपासून सातत्याने महापालिका मालकीच्या १९७ जागांबाबत पाठपुरावा करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य कमलेश देवरे यांनी गुरुवारी पुन्हा हा विषय उपस्थित करत काय कार्यवाही, प्रगती झाली, अशी विचारणा केली. याविषयावर नगररचनाकार परदेशी यांनी संबंधितांना नोटिसा बजावल्या. मात्र, कुणाकडूनही खुलासा आलेला नाही, असे उत्तर दिले. याच विषयावर नंतर या जागांचा विषय हाताळत असलेल्या एन. पी. सोनार यांनी दोन वकिलांमार्फत संबंधितांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही करीत असल्याचे सांगितले. 

काँग्रेस भवनापासून सुरवात करा 
मनपा जागांच्या या चर्चेचा धागा पकडत सभापती बैसाणे यांनी संबंधितांकडून खुलासे आले नाहीत, याचा अर्थ महापालिकेने दिलेली नोटीस त्यांना मान्य आहे. त्यामुळे ज्या जागांचे करार संपले आहेत, त्या ताब्यात घ्या आणि कार्यवाहीची सुरवात काँग्रेस भवनापासून करा, असा आदेश अधिकाऱ्यांना दिला. मनुष्यबळाची कमतरता असेल, तर महापालिकेचा विश्‍वस्त या नात्याने मी स्वतः तेथे जाईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. याच विषयावर श्री. बैसाणे यांच्याशी नंतर संपर्क साधला असता, त्यांनी कराराने दिलेल्या सर्वच जागांचा हा विषय आहे व काँग्रेस भवन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. या भागात वाहतुकीची कोंडीही होते. त्यामुळे अतिक्रमण झाले असेल, तर ते काढून रस्ता रुंद करता येईल. शिवाय कराराने दिलेल्या जागांबाबत कारवाई करताना एखाद्या मोठ्या संस्थेपासून सुरवात केली, तर इतरांना त्याचा धाक बसेल व कार्यवाही सुरळीत होऊ शकेल, हा उद्देश त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. 

आवश्य वाचा- Success story : एक गाव असे.. पहा कसे नटले; शहरात नाही ते सारे गावात
 

करार सहा वर्षांपूर्वी संपला 
काँग्रेस भवनाच्या जागेचा करार पाच ते सहा वर्षांपूर्वीच संपला आहे. ही गोष्ट स्थायी समितीत गुरुवारी उजेडात आली. अशावेळी सर्वसामान्यांना जो कायद्याचा धाक दाखविला जातो, तो काँग्रेस भवनाबाबत दाखविला जातो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule over the office of the municipal corporation congress orders of standing committee chairpersons