सौराष्ट्रातून 263 ऊसतोड मजूर परतले स्वगृही 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

आमदार मंजुळा गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून संबंधित मजुरांना मूळगावी परत आणले. त्यांना क्वारंटाइन करून घरी राहण्यास सांगितले.

पिंपळनेर : लॉकडाउन काळात इदगावपाडा (पिंपळनेर, ता. साक्री) येथील 263 ऊसतोड मजूर गेल्या दीड महिन्यापासून सोमनाथ-सौराष्ट्र (ता. सुत्रापाडा, जि. गिर, गुजरात) येथे अडकून पडले होते. आमदार मंजुळा गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून संबंधित मजुरांना मूळगावी परत आणले. त्यांना क्वारंटाइन करून घरी राहण्यास सांगितले. लुपीन फाउंडेशनतर्फे अल्पोपाहार, विश्व मानव केंद्र व संभाजी अहिरराव यांनी सर्व मजुरांची जेवणाची व्यवस्था केली. 

खर काय? : मालेगावचे कोरोनाग्रस्त रूग्ण धुळ्यात आणण्याचा घाट!; आताच असंतोष...

"लॉकडाउन' काळात इदगावपाडा (पिंपळनेर) येथील ऊसतोड मजूर दिड महिन्यांपासून सोमनाथ-सौराष्ट्रमध्ये अडकून पडले आहेत, याबाबत ईश्‍वर ठाकरे, कैलास भारुडे यांनी धुळ्यातील गोरख भोये यांच्या माध्यमातून आमदार गावित यांना सांगितले व मजुरांना मूळगावी आणण्याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली. त्यानुसार आमदार गावित व डॉ. तुळशिराम गावित, ज्ञानेश्वर पवार, अजित बागूल यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. प्रारंभी 51 मजुरांचा गट 6 एप्रिलला गुजरात येथून धुळे जिल्ह्यात आणला. त्यानंतर दुसरा गट काल येथील ग्रामीण रुग्णालयात येऊन पोचला. 
आमदारांच्या उपस्थितीत सर्व मजुरांची तपासणी करून क्वारंटाइन करण्यात आले. उर्वरित मजुरांना टप्प्याटप्प्याने स्वगावी आणण्याचे नियोजन केल्याने इदगावपाडा ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. आमदार गावित व डॉ. गावित यांचे सर्वांनी आभार मानले. याकामी श्रीराम आदिवासी सेवा इदगावपाडा संस्थेचे पदाधिकारी व समाजबांधवांचे सहकार्य लाभले. यावेळी तहसीलदार विनायक थविल, ग्रामीण रुग्णालयात आमदार प्रतिनिधी जितेंद्र कुवर, अजित बागूल, अनिल बागूल ईश्वर ठाकरे, राहुल ठाकरे, राजेंद्र पगारे आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule pimapner ustod worker return home lockdown