खर काय? : मालेगावचे कोरोनाग्रस्त रूग्ण धुळ्यात आणण्याचा घाट!; आताच असंतोष...

निखिल सूर्यवंशी
Thursday, 7 May 2020

मालेगावसह नाशिकमधील राजकीय दबावामुळे या हालचाली सुरू असल्याची वार्ता धुळे जिल्ह्यात आज रात्री नऊनंतर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आताच असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धुळे : संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'ची लागण झालेला आणि राज्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव येथील कोरोनाग्रस्त रूग्णांना धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकिय शासकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात स्थलांतरीत करण्याचा घाट घातला जात आहे. मालेगावसह नाशिकमधील राजकीय दबावामुळे या हालचाली सुरू असल्याची वार्ता धुळे जिल्ह्यात आज रात्री नऊनंतर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आताच असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कायदा- सुव्यवस्था बिघडण्याची भिती विविध पातळीवरून व्यक्त केली जात आहे. यात खरे काय? हे शासनासह धुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.

नक्‍की पहा - एक वर्षाचा चिमुरडा...मृत्यूच्या दारेतून "कोरोना' फायटरने वाचविले...
धुळे आणि मालेगावचे संबंध सर्वश्रुत आहे. मालेगावचा "कोरोना'चा विळखा अद्याप सुटत नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. तेथील प्रार्दुभाव रोखण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना सुरू आहेत. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती मालेगावला केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात 500 हून अधिक कोरोना बाधित रूग्ण असून त्यात एकट्या मालेगावला 430 हून अधिक रूग्ण आहेत. पाच दिवसांपूर्वीच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मालेगावचे कोरोनाग्रस्त रूग्ण धुळ्यात स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मांडला होता. तो धुळ्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परतवून लावला होता. यानंतर पुन्हा या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली आहे. मालेगाव व नाशिक येथील काही राजकीय मंडळींनी एकत्र येत धुळे येथील हिरे वैद्यकिय महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रूग्णालय जवळ असल्याने तेथे उपचारासाठी मालेगावचे रूग्ण पाठवावे, अशा हालचाली सुरू असल्याची वार्ता रात्री नऊनंतर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली.

...तर मालेगावची वाहने अडवू
या पार्श्‍वभूमीवर "आयएमए'चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणाले, की माझ्यापर्यंत ही वार्ता आली असून नाशिक येथे कुंभमेळा होताना 50 लाख ते एक कोटी भाविकांची व्यवस्था करणारे, रूग्णालयांमध्ये हजार खाटा उपलब्ध करणारे नाशिक जिल्हा प्रशासन मालेगाव येथील रूग्णांची व्यवस्था का करू शकत नाही? नाशिक जिल्ह्यात, लगतच्या जिल्ह्यात अनेक मोठी रूग्णालये असताना धुळ्यात मालेगावचे रूग्ण स्थलांतर करण्याचा घाट घातला जात असेल तर ते संयुक्तीक ठरणार नाही. मालेगावच्या एका रूग्णाबरोबर एक ते दोन नातेवाईक येतील आणि त्याचा धुळ्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भिती आहे. भाजपचे नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे म्हणाले, की मालेगावचे रूग्ण धुळ्यात आणण्याचा घाट घातला जात असल्याचे वृत्त रात्री कळाले. त्यास तीव्र विरोध असून प्रसंगी धुळे जिल्ह्याच्या सीमेवर मालेगावहून येणारी "ती' वाहने अडविण्यास मागे-पुढे पाहणार नाही. नाशिक शहर व जिल्ह्यात अनेक मोठे हॉस्पिटल असून त्यांनीच मालेगावच्या रूग्णांची सोय करावी. दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनीही या प्रकाराला विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांनी मालेगावचे रूग्ण धुळ्यात स्थलांतर करण्यास विरोध असून तसे घडल्यास तो संतापजनक प्रकार असेल. तो डाव हाणून पाडला जाईल. धुळे कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने धोक्‍यात आहे. त्यात आणखी मालेगावचा धोका परवडणार नाही, असे सांगत नेते अजित पवार, राजेश टोपे यांच्यापर्यंत अंसतोष असलेल्या धुळेकरांच्या भावना पोहचवत असल्याचे म्हणाले.

वैद्यकिय महाविद्यालयाची स्थिती
वैद्यकिय महाविद्यालय व सलग्न जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात मनुष्यबळ व पायाभूत सुविधा कमी आहेत. त्यामुळे आताच कोरोना बाधित व संशयितांवर उपचार करताना ओढातण होत आहे. चार वर्षांपासून पंधराहून अधिक प्राध्यापक, निवासी डॉक्‍टरांची पदे रिक्त आहेत. तसेच 29 एप्रिलनंतर कोरोना बाधित व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण थांबलेले आहे. त्यात मालेगावची भर पडल्यास गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते, अशी भिती व्यक्त होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news malegaon corona patient shift dhule medical hospital