esakal | धुळे जिल्ह्यात टँकसह चार ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

oxigen tank

धुळे जिल्ह्यात टँकसह चार ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांची तयारी

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नाशिकच्या ऑक्सिजनसंबंधी दुर्घटनेनंतर प्रशासन आणखी ‘अलर्ट’ झाले आहे. तत्पूर्वीच, ऑक्सिजन ऑफिसर्सची नियुक्ती, ऑक्सिजनची पाइपलाइन व आनुषंगिक यंत्रांची दर तासाला तपासणी आणि स्थितीचे मॉनिटरिंग होत आहे. या संदर्भात कुठलीही हानी होऊ नये, म्हणून वेळीच दक्षता राखली जात आहे, असे सांगत धुळे हिरे मेडिकल कॉलेजला ऑक्सिजन स्टोअरेज टँकसाठी मान्यता, तर सिव्हिल हॉस्पिटलसह साक्री, दोंडाईचा, शिरपूर येथे ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाला मान्यता देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी ‘सकाळ’ला दिली.

हेही वाचा: जळगावात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार करणारी टोळी पकडली

जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की काही दिवसांपूर्वीच महापालिका, सिव्हिल हॉस्पिटलमधील संबंधित अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील कोविड सेंटरसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ऑक्सिजन ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप केला असून, त्यावर मी २४ तास देखरेख ठेवत आहे. जिल्ह्याला मंजूर कोट्याप्रमाणे टँकर मिळतो का, तो फिलिंग सेंटरवरून निघाला किंवा नाही, किती वेळ झाला, जिल्ह्यात सुयोग्य पद्धतीने वितरण होतेय किंवा नाही या बारीकसारीक माहितीवर जातीने लक्ष ठेवून आहे. तीन दिवसांपूर्वी जिल्ह्याला रोज लागणाऱ्या एकूण ३२ टन ऑक्सिजनपैकी १६ टनांच्या एकाच टँकरची उपलब्धता झाली होती. दुसरा १६ टनांचा टँकर मिळविण्यासाठी सचिव सौरभ कुमार, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांशी संपर्कात राहिल्यावर पहाटे चारला टँकर देण्यात आला. त्यामुळे मोठे संकट टळू शकले. त्यापूर्वीही जिल्ह्यात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाल्यानंतर बफर स्टॉकची सुविधा करून ठेवल्याने आठ तास ऑक्सिजन मिळाला. त्यामुळे रुग्णांना कुठलाही त्रास झाला नव्हता.

दर तासाला मॉनिटरिंगची रचना
प्रशासकीय पातळीवरील व्हॉट्सॲप ग्रुपवर दर तासाला अपडेट तपासले जाते. प्रत्येक शासकीय व खासगी रुग्णालयात एका कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली असून, तो दर तासाला ऑक्सिजनच्या स्थितीचे अपडेट देत असतो. त्यात ऑक्सिजनचा साठा किती, पाइपलाइन व यंत्रसामग्री तपासणे, गळतीबाबत कुठला धोका तर दिसत नाही ना यांसह बारीकसारीक तपासणी करून ऑक्सिजन ऑफिसरला माहिती दिली जात आहे. पुन्हा या सर्व स्थितीवर सर्व तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना देखरेख व नियंत्रण ठेवण्याची रचना केली आहे. प्रसंगी ते विविध ठिकाणी भेटी देऊन ऑक्सिजन प्रणालीची तपासणी करतात. एखाद्या ठिकाणी तांत्रिक अडचण उद्‌भवल्यास संबंधित रुग्णांना कुठलाही त्रास न होता इतरत्र स्थलांतरित करण्याची व्यवस्था करून ठेवली आहे.

हेही वाचा: कोरोना काळात..जळगाव शहरात दरमहा १०० ने वाढ

दुसऱ्या-तिसऱ्या लाटेसाठी सज्जता
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मेडिकल ऑक्सिजनची रोज सरासरी ३२ ते ३५ टन गरज भासत आहे. यात सरासरी लिक्विड ऑक्सिजनचा १६ टनांचा एक टँकर रोज हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयास दिला जातो. उर्वरित दुसरा १६ टनांचा टँकर रोज अन्य कोविड सेंटर असलेल्या रुग्णालयांसाठी उपयोगात आणला जातो. पुढील महिन्यात किंवा नंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दुसऱ्या लाटेत लहानगे, तरुणांनाही त्रास जाणवत आहे. तिसऱ्या लाटेतील विषाणू किती भयंकर असेल, हे आता सांगता येणे शक्य नाही. नागरिकांनी संचारबंदी, लॉकडाउनसंबंधी नियमांचे पालन केले नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहिला, तर जिल्ह्याला रोज सरासरी ५० टन ऑक्सिजनची गरज भासू शकते. राज्यात सद्यःस्थितीत ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा जाणवत असल्याने जिल्ह्यातच ऑक्सिजननिर्मितीवर भर देण्याचे नियोजन अमलात आणण्यास सुरवात केली आहे.

टँकसह चार प्रकल्पांची तयारी
या पार्श्वभूमीवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयास २० टन ऑक्सिजन स्टोअरेज टँकला मान्यता दिली आहे. त्यामुळे हिरे महाविद्यालयात आधीच्या १३ टन टँकसह एकूण क्षमता ३३ टन होणार आहे. उर्वरित सरासरी १५ ते १७ टन ऑक्सिजनची गरज भागावी, म्हणून धुळे शहरातील साक्री रोडवरील सिव्हिल हॉस्पिटल, साक्री, शिरपूर आणि दोंडाईचा येथे ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यासंबंधी तयारी सुरू केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव आल्यावर लागलीच प्रशासकीय मान्यता दिली जाईल. शिवाय ५० व त्याहून अधिक बेड असलेल्या व ज्यांना शक्य आहे, अशा संबंधित सर्व रुग्णालयांना ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारावा, असे सूचित केले आहे. या प्रयत्नांतूनच जिल्ह्याची भविष्यातील रोज सरासरी ५० टन ऑक्सिजनची गरज भागू शकेल. यात हिरे मेडिकलमधील ऑक्सिजन स्टोअरेजची क्षमता वाढल्यावर गरजेनुसार आणखी तीनशे बेड वाढविणे शक्य होऊ शकेल.

हेही वाचा: झाडांच्‍या फांद्यांना सलाईन; रूग्‍ण स्‍वतःची खाटच घेवून येत घ्‍यायचे इलाज

कॉन्सन्ट्रेटर, जनरेटरची खरेदी
हवेतून ऑक्सिजन मिळवून थेट रुग्णांना मिळण्यासाठी कॉन्सन्ट्रेटर मशिन, तसेच जनरेटर खरेदीची तयारी सुरू केली आहे. ऑक्सिजनबाबत जी तयारी करत आहोत, त्यात विजेचा मोठा सहभाग आहे. या यंत्रणेसाठी वीज मोठ्या प्रमाणावर लागते. ती खंडित झाली तर संकट उद्‌भवते. त्यामुळे ३२ केव्हीचे जनरेटर खरेदीची तयारी आहे. वीज गेली तरी जनरेटर उपयोगी पडले. सरासरी दहा ते १२ लाखांना एक जनरेटर मिळेल. त्यासाठी एकूण ५० लाखांचा निधी दिला जाईल. तसेच भविष्यात ऑक्सिजनची यंत्रणा बंद पडू नये, निधीचा अपव्यय होऊ नये म्हणून ही सोय केली जात आहे. ४० हजारांना मिळणारे कॉन्सन्ट्रेटर १५ दिवसांत उपलब्ध होतील. अशा सर्व नियोजनातून कोरोनाशी सामूहिकतेने लढा देता येऊ शकेल, त्यासाठी प्रशासनाला साथ मिळावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यादव यांनी व्यक्त केली.


ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण; निधीची उभारणी
जिल्हाधिकारी यादव यांनी तिसरी लाट येण्यापूर्वी जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होईल, त्यासाठी इतर कुणावर अवलंबून राहावे लागणार नाही, असे नियोजन अमलात आणण्यास प्रारंभ केला आहे. ते म्हणाले, की कोरोनाबाबत उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून १० टक्के निधी खर्च करण्यास परवानगी मिळाली आहे. शिवाय आमदारांना स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी एक कोटी खर्च करण्यास मुभा मिळाली आहे. ऑक्सिजननिर्मितीबाबत जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी आमदारांनी निधी देऊन योगदान द्यावे, अशी विनंती करत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image