काय सांगताय : धुळे जिल्हा सर्वोपचार रूग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमधील सात जण 'मिस- प्लेस'! 

निखिल सूर्यवंशी
Tuesday, 28 April 2020

उत्तर महाराष्ट्रासाठी महाविद्यालयात कोरोना टेस्ट लॅब सुरु झाली. तिच्यावर नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील भार आहे. दिवसागणिक तपासणीसाठी रुग्णांची संख्या वाढत असल्याने अहवाल प्राप्त होण्यासाठी विलंब लागत आहे.

धुळे : विविध कारणांमुळे बहुचर्चित ठरत असलेल्या धुळे शहरालगतच्या भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातून पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास सात व्यक्ती निघून गेले आहेत. ते सातही जण संसर्गजन्य कोरोना व्हायरससंदर्भात असलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये (विलगीकरण कक्ष) क्वारंटाइन होत्या. सुदैवाने त्या व्यक्ती पॉझिटिव्ह नव्हत्या. 

क्‍लिक करा - अजब फंडा : घरपोच दारूसाठी व्हॉटस्‌ऍपवर बुकिंग... 

जिल्हा सर्वोपचार रुग्णालयावर सध्या रूग्ण तपासणीचा सर्वाधिक भार आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी महाविद्यालयात कोरोना टेस्ट लॅब सुरु झाली. तिच्यावर नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील भार आहे. दिवसागणिक तपासणीसाठी रुग्णांची संख्या वाढत असल्याने अहवाल प्राप्त होण्यासाठी विलंब लागत आहे. 

गर्दीचा घेतला फायदा 
एकीकडे ही स्थिती असताना रुग्णालयातील एक डॉक्‍टर तांत्रिक चुकीमुळे पॉझिटिव्ह आला नंतर सकाळी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह व निगेटिव्ह दाखविण्यात आला. शिवाय जिल्हाभरातील तपासणीसाठी येणाऱ्या व कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील असंख्य व्यक्ती जिल्हा रुग्णालयात आणल्या जात असल्यामुळे तिथे गर्दीवर नियंत्रण ठेवणे अडचणीचे ठरू लागले आहे. कोरोना आजाराला बहुतांश सर्वच घाबरत असल्यामुळे अंतर ठेवत जो- तो आपली जबाबदारी पार पडण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचाच गैरफायदा उचलत व पुरेशा सुरक्षिततेअभावी जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षातील सात व्यक्ती पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास निघून गेल्या. त्यात एका महिलेचा समावेश आहे. त्यात संबंधित व्यक्ती पळून गेल्याची चर्चा धुळे शहरात पसरली. 

परत आणण्याचा दावा 
त्या व्यक्ती गर्दीमध्ये इकडे तिकडे मिस-प्लेस झाल्या असाव्यात, त्यांचा संपर्क क्रमांक आमच्याकडे असून, त्यांना पोलिसांच्या सहकार्याने पुन्हा रुग्णालयात आणले जाईल, असा दावा रुग्णालय व्यवस्थापनाने केला. त्या व्यक्ती संशयित म्हणून विलगीकरण कक्षामध्ये दाखल होत्या. त्यांचा अहवाल अप्राप्त असल्याने आणि त्या पॉझिटिव्ह नसल्याने तूर्त दिलासादायक स्थिती आहे. ही स्थिती पाहता हिरे महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाला आता सुरक्षा व्यवस्थेवरदेखील भर द्यावा लगणार आहे. जिल्हाधिकारी संजय यादव आणि पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनाही या घटनेची गांभीर्याने दाखल घ्यावी लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule quarantine sevan paisnts ward run up morning