esakal | आरक्षण मिळावे पण ‘राजर्षीं‘च्या प्रतिमेला धक्का नको : राजवर्धन कदमबांडे
sakal

बोलून बातमी शोधा

rajvardhan kadambande

कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्वच समाजाच्या उत्थानाचे काम केले. त्यांच्या या मूळ भूमिकेस कुठेही तडा जाणार नाही, याची काळजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी घ्यावी.

आरक्षण मिळावे पण ‘राजर्षीं‘च्या प्रतिमेला धक्का नको : राजवर्धन कदमबांडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : मराठा समाजाला टिकणारे, कायदेशीर व घटनात्मक तरतूद असलेले आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र, हे करत असताना इतर समाजघटकाच्या हिताचे, आरक्षणाचे रक्षण करण्याची जबाबदारी राजर्षी छत्रपतींच्या रक्ताचे वंशज म्हणून आपली सर्वांची आहे. राजर्षी शाहू महाराजांप्रति इतर समाज बांधवांमध्ये जी आदराची भावना आहे, त्यास धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षावजा सूचना धुळे शहराचे माजी आमदार तथा कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नात पद्माराजे यांचे ज्येष्ठ चिरंजीव राजवर्धन कदमबांडे यांनी खासदार संभाजीराजे भोसले यांना केली आहे. 

मराठा आरक्षणासंदर्भात सकल मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक नुकतीच नाशिक येथे झाली. या बैठकीला खासदार संभाजीराजे भोसले उपस्थित होते. याचा संदर्भ देत श्री. कदमबांडे यांनी म्हटले आहे, की कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्वच समाजाच्या उत्थानाचे काम केले. त्यांच्या या मूळ भूमिकेस कुठेही तडा जाणार नाही, याची काळजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी घ्यावी. स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक होते. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारे, ठोस कायदेशीर व घटनात्मक तरतूद असणारे आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र, हे करत असताना इतर बहुजन, ओबीसी, मागास समाजाच्या हिताचे आरक्षण व त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी राजर्षी छत्रपतींचे वंशज म्हणून आपली सर्वांची आहे. खासदार श्री. भोसले यांनी सकल मराठा क्रांती मोर्चाचे काम करत असताना, राजर्षी शाहू महाराजांप्रति इतर समाज बांधवांमध्ये जी आदराची भावना आहे, त्यास धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी अशी अपेक्षाही श्री. कदमबांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.