कोरोना टेस्‍टसाठीचे सुधारीत दर; राज्‍य शासनाने काढले निर्देश

निखील सुर्यवंशी
Thursday, 17 December 2020

खासगी प्रयोगशाळांशी चर्चा करून आरटीपीसीआर तपासणीच्या दराबाबतचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यानुसार शासनाने वेळोवेळी दर निश्‍चित केले. आता सुधारित दर निश्चित केले आहे. 

धुळे : खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या आरटीपीसीआर तपासणीचे सुधारित दर शासनाने निश्‍चित केले आहेत. सुधारित दर आता सर्व करांसहित एक हजार रुपयांच्या आत आल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 
भारतीय आयुर्विज्ञान संस्था व एनएबीएल मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांकडून कोरोनासाठी असलेल्या आरटीपीसीआर तपासणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन झाली. तिने तत्कालीन लॉकडाउन परिस्थितीत मर्यादित साधनांची उपलब्धता लक्षात घेऊन, खासगी प्रयोगशाळांशी चर्चा करून आरटीपीसीआर तपासणीच्या दराबाबतचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यानुसार शासनाने वेळोवेळी दर निश्‍चित केले. आता सुधारित दर निश्चित केले आहे. 

तपासणीचा खर्च कमी 
‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत राज्यातील औद्योगिक, औषध निर्माण संस्था सुरू झाल्या आहेत. तसेच परिवहन व्यवस्थाही सुरू झाली आहे. तपासणीसाठी आवश्‍यक साहित्य (रिएजंट्स, व्हीटीएम किट्स व पीपीइ किट्स, आरएनए एक्स्ट्रॅक्शन किट) जीईएम पोर्टलवर अत्यंत माफक दरात उपलब्ध आहे. एन ९५ मास्कचे कमाल दरही १४ ते ४९ रुपयांपर्यंत निश्चित केले आहेत. आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने उपलब्धता वाढली आहे. तसेच वाहतूक व्यवस्थाही सुरळीत झाल्याने वाहतुकीवरील खर्चही कमी झाला आहे. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांना येणारा तपासणी खर्च कमी झाला आहे. तसेच राज्यात आयसीएमआर व एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

राज्य शासनाची सूचना 
या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचण्यांचे दर कमी होणे आवश्‍यक होते. त्यासाठी समितीला सुधारणांबाबत निर्देश दिले होते. समितीने दिलेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर चाचणीचे सुधारित दर शासनाने निश्चित केले आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला निश्‍चित केलेल्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक दर आकारता येणार नाहीत, असे शासनाने स्पष्ट केले आहे. प्रयोगशाळेत सॅम्पल देणाऱ्याने आवश्‍यक साहित्य पुरविण्याचेही यात नमूद आहे. इतर सॅम्पल कलेक्शनच्या प्रक्रियेत मात्र संबंधित प्रयोगशाळा हा खर्च करेल. 
 
सॅम्पल घेण्याचा तपशील.... ७ जुलै ... २४ ऑक्टोबर... सुधारित दर (प्रतितपासणी) 
स्वतः प्रयोगशाळेत ........ १,२००........ ९८० .............. ७०० 
ठिकठिकाणी जमा सॅम्पल ..१,६०० ......१,४०० ............. ८५० 
रुग्णाच्या घरी ...............२,००० ......१,८०० ............ ९८० 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule revised rates for corona test