धुळ्यात प्रसूती कक्षाच्या सुविधेचा प्रश्‍नी नगरसेवकाने आत्मदहनाचा केला प्रयत्न 

निखील सुर्यवंशी
Monday, 5 October 2020

नगरसेवक पटेल, रफीक शाह, इरफान शाह आत्मदहन करणार होते. त्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

 
धुळे ः जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील प्रसूती कक्षाच्या सुविधेप्रश्‍नी चक्करबर्डीतील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात समाजवादी पक्षाचे नगरसेवक अमिन पटेल यांनी अंगावर रॉकेल ओतून सोमवारी सकाळी अकराला आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी वेळीच रोखले आणि ताब्यात घेतले. 

आवश्य वाचा- साडेआठ कोटी रुपये खर्च  करून पाण्याची टाकी बांधली, पाणी भरताच ती लागली गळायला ! 
 

सर्वोपचार रुग्णालयात नॉन- कोविड रुग्णसेवेसह महिला प्रसूती कक्ष सुरू करावा, यासाठी समाजवादी पक्षाचे आंदोलन होते. नगरसेवक पटेल, रफीक शाह, इरफान शाह आत्मदहन करणार होते. त्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यासंदर्भात आमदार अबू असीम आझमी यांनी आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिले. त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आंदोलन झाले.

 

याबाबत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठकही झाली होती. तीत इनाम सिद्दीकी, गुलाम कुरेशी, सलीम टेलर, निहाल अन्सारी, कलीम कुरेशी आदी उपस्थित होते. याप्रश्‍नी हिरे महाविद्यालय व्यवस्थापनाने सांगितले, की सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी ३००, तर नॉन- कोविड रुग्णांसाठी दोनशे खाटा राखीव आहेत. गरजूंना सुविधेसह उपचार दिले जात आहेत. कोविडचा इतरांना संसर्ग होऊ नये, म्हणून दक्षता घेतली जात आहे. ही स्थिती नगरसेवक पटेल यांना समजावून सांगितली. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Samajwadi Party corporator tried to set himself on fire over women's maternity ward in Dhule