भाजपविरोधात फडकवला भगवा झेंडा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

राज्यात महाविकास आघाडीद्वारे ठाकरे सरकार सत्तेत आले. ते सहा महिन्यांवर टिकणार नाही, त्यांना सरकार चालवायचा अनुभव नाही, लवकरच "ऑपरेशन लोटस'द्वारे भाजप सत्तेत येईल, अशा वावड्या केविलवाण्या पद्धतीने विरोधकांनी उठविल्या. सत्तेत नसल्यामुळे नैराश्‍यातून भाजपचे संतुलन बिघडले आहे.

धुळे : राज्यातील ठाकरे सरकारविरोधात काळा दिवस पाळणाऱ्या भाजपविरोधात शिवसेनेने कोरोना योद्धांना भगवा झेंडा दाखवून सलामी दिली. जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी ही माहिती दिली. 
ठाकरे सरकारविरोधात भाजपने शुक्रवारी काळा दिवस पाळून आंदोलन केले. त्याविरोधात शिवसेनेने येथे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात शारिरीक अंतर पाळत केलेल्या आंदोलनाने प्रत्युत्तर दिले. विविध घोषणाबाजीतून भाजपचा निषेध केला. जिल्हाप्रमुख माळी यांनी सांगितले, की जगात सर्वत्र कोरोनाने कहर केला आहे. अशा संकट काळात विरोधी भाजपने सरकारच्या हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. मात्र, भाजप राजकारणात मश्‍गुल आहे. यातून भाजपला काहीही साध्य होणार नाही. 

क्‍लिक करा - दोन महिन्यानंतर शहर झाले मोकळे; नागरीकांना नाही भिती कोरोनाची

राज्यात महाविकास आघाडीद्वारे ठाकरे सरकार सत्तेत आले. ते सहा महिन्यांवर टिकणार नाही, त्यांना सरकार चालवायचा अनुभव नाही, लवकरच "ऑपरेशन लोटस'द्वारे भाजप सत्तेत येईल, अशा वावड्या केविलवाण्या पद्धतीने विरोधकांनी उठविल्या. सत्तेत नसल्यामुळे नैराश्‍यातून भाजपचे संतुलन बिघडले आहे. जनता ठाकरे सरकार सोबत आहे. संकटाचा सामना कसा करायचा हे अनुभवी ठाकरे घराण्याला सांगण्याची गरज नाही. बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी सत्तेसाठी आसुसलेल्या भाजपने पराभवाचे आत्मपरीक्षण करावे. भाजपप्रणीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला वगळून इतर राज्यांना संकटकाळात निधीचे पॅकेज दिले. असा भेदभाव का? राज्यात राहणाऱ्या भाजपच्या आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पंतप्रधान सहाय्यता निधीला प्राधान्य दिले. हा भेदभावच आहे. ते पाहता भाजपला कोविडऐवजी कावीळची बाधा झाली आहे. रात्रंदिवस कोरोनायोद्धा म्हणून डॉक्‍टर्स, नर्स, पोलिस अधिकारी- कर्मचारी, मनपा, पालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महसुली यंत्रणा आदी मेहनत घेत आहेत, तरीही ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा कांगावा भाजप करत आहे. कुठल्या वेळेला काय करावे हे भाजपला कळणार नाही, अशी टीका पत्रकाद्वारे आंदोलक श्री. माळी, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, डॉ. सुशील महाजन, माजी विरोधी पक्षनेते रवींद्र काकड, उपमहानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, विकास शिंगाडे, केशव माळी, शत्रुघ्न तावडे, पुरुषोत्तम जाधव आदींनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule sena bhagva flag hoisted against BJP