
राज्यात महाविकास आघाडीतर्फे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत होते. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शिरपूर येथे आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार गोटे हे कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते.
धुळे : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शिरपूर येथे आज (8 डिसेंबर) आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांना चक्कर आली.
केंद्रातील भाजप सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात आज भारत बंदची हाक पुकारत आंदोलन पुकारण्यात आले होते. यात विविध राजकीय पक्षांसह शेतकऱ्यांचा देखील सहभाग होता. राज्यात महाविकास आघाडीतर्फे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत होते. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शिरपूर येथे आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार गोटे हे कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झाल्यानंतर गोटे यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
यापुर्वीही असा प्रकार
माजी आमदार अनिल गोटे यांना कार्यक्रमामध्ये चक्कर येऊन त्यांची तब्येत बिघडल्याची घटना यापुर्वी देखील घडली आहे. आज पुन्हा एकदा अनिल गोटे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आंदोलनादरम्यान नेतृत्व करत असताना शिरपूर येथे चक्कर येऊन त्यांची तब्येत खालावली. परंतु अनिल गोटे यांच्यावर तत्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.