ऐतिहासिक माळेसह मालुसरेंच्या "सेल्फी'साठी गर्दी! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

शिवजयंती व दसऱ्याला माळेची पूजा केली जाते, असे तानाजी मालुसरेंच्या बाराव्या वंशज प्रा. डॉ. शीतल मालुसरे यांनी सांगितले. 

धुळे  : हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतील योद्धा नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून राज्यासह जगभरात पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी असलेले तानाजी "कोंडाणा' सर करताना धारातीर्थ पडले. त्या वेळी छत्रपतींनी त्यांच्या गळ्यातील कवड्यांची माळ तानाजींच्या देहावर अर्पण केली. ती प्रतापगडाच्या पायथ्याशी ठेवली होती. साडेतीनशे वर्षापासून ती ऐतिहासिक माळ वंशजांनी जपून ठेवली. शिवजयंती व दसऱ्याला माळेची पूजा केली जाते, असे तानाजी मालुसरेंच्या बाराव्या वंशज प्रा. डॉ. शीतल मालुसरे यांनी आज येथे सांगितले. 

क्‍लिक कराः जय शिवाजीच्या जयघोषाने दुमदुले जळगाव शहर...
 

श्रीमती मालुसरे म्हणाल्या, की छत्रपती शिवरायांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूनंतर रायबा मालुसरे यांना पालघर येथील किल्ल्याची सुभेदारी दिली. ते सोबत पाचशे मावळ्यांसह पालघर येथील गडावर स्थायिक झाले. कालांतराने उपजीवकेनुसार त्यांचे वंशज अनुक्रमे अप्पाजी, बलवंतराव, नारायण, सासरे बाळकृष्ण मालुसरे गडाबाहेर पडले. बेळगाव, मुंबई असा उपजीवकेचा प्रवास राहिला. माझे सासरे बाळकृष्ण मालुसरे हे राज्य इतिहास परिषदेचे अध्यक्ष होते. माझ्या पतीचे निधन झाले. तीन मुलाबांळासह महाड येथे भाड्याच्या घरात राहाते. तानाजी मालुसरे यांची बोडावली जन्मभूमी असून उमरट कर्मभूमी आहे. वंशपरंपरागत माळ सासूबाईंकडून मिळाली. दिग्दर्शक ओम राऊत यांनी तानाजी मालुसरे यांच्यावर काढलेला हिंदी चित्रपट चांगला आहे. तानाजी धारातीर्थ पडले तेव्हा छत्रपती शिवरायांनी "गड आला, पण सिंह गेला', अशी सहसंवेदना व्यक्‍त केली होती. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. श्रीमती मालुसरे यांनी घोरपडीचा इतिहास नाकारत घोरपडे नावाचे सरदार होते, "तो' चुकीचा इतिहास असून त्याचे पुरावे असल्याची माहिती दिली. दरम्यान, मराठा युवक मंडळातर्फे मिरच्या मारुती खुंटापासून दुपारी निघालेल्या, तसेच मुख्य शिवजयंती उत्सव समितीतर्फे सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेत ऐतिहासिक माळेसह सहभागी श्रीमती मालुसरे यांच्यासमवेत "सेल्फी'साठी शिवरायप्रेमींनी गर्दी केली होती. 
 

क्‍लिक कराः  जळगाव कलेक्‍टर टोचतात सिव्हील यंत्रणेचे कान..तेव्हा !
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule shiv jayanti tanaji malusare mal