esakal | कोरोनाच्या संसर्गानंतर  एमआयएस- सी आजारावर सहा बालकांची केली मात 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या संसर्गानंतर  एमआयएस- सी आजारावर सहा बालकांची केली मात 

कोरोनावर मात केल्यानंतर रक्त गोठण्याची प्रक्रिया जलद झाल्याने रक्ताच्या गाठी होण्याचा आणि त्यामुळे इतर महत्त्वाच्या अवयवांच्या निकामी होण्याची शक्यता बळावली होती.

कोरोनाच्या संसर्गानंतर  एमआयएस- सी आजारावर सहा बालकांची केली मात 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर बालकांमध्ये मल्टी सिस्टिम इंफ्लामेटरी सिन्ड्रोम (MIS-C) हा आजार डोके वर काढतो. मात्र, त्याला घाबरून न जाता देवगाव (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील साडेचार वर्षांच्या बाधित बालकाने पालक आणि डॉक्टरांनी दिलेल्या हिमतीच्या बळावर या आजारावर मात केली. सप्टेंबरपासून आतापर्यंत असे सहा रुग्ण बरे झाल्याची माहिती येथील अशोकनगरमधील ‘संगोपन’चे बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिनय दरवडे यांनी दिली. 

आवश्य वाचा- खडसेंचा घटस्थापनेला राष्ट्रवादीत प्रवेश ? असे ठरलेय प्रवेशाचे सुत्र

पारोळ्यापासून पुढे देवगाव आहे. तेथील साडेचार वर्षांच्या बालकाला बरे वाटत नसल्याने भयभीत पालक डॉ. दरवडे यांच्याकडे आले. बालकाचे संपूर्ण शरीर पाच दिवसांपासून सुजलेले होते. सूज इतकी की त्याला डोळे नीट उघडता येत नव्हते आणि धड चालता येत नव्हते. 

फणफणता ताप, पोटदुखीने तो त्रस्त होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय क्षेत्रात चालणाऱ्या नवनवीन घडामोडींवर सतत ऑनलाइन परिसंवादात सहभागी होण्याची संधी डॉ. दरवडे साधत होते. त्यामुळे त्यांना कोरोना झाल्यानंतर बालकांमध्ये उद्‌भवणाऱ्या मल्टी सिस्टिम इंफ्लामेटरी सिन्ड्रोम (MIS-C) या आजाराची माहिती झाली. पाश्चात्त्य देशांमध्ये या आजाराची बालके आढळून येत आहेत. 

तपासणीनंतर देवगावचा बालक मल्टी सिस्टिम इंफ्लामेटरी सिन्ड्रोमने बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या अहवालात यकृत (लिव्हर), प्लिहा (स्प्लिन), पित्ताशय (गॉल ब्लॅडर) आणि आतड्याला सूज दिसली. छाती आणि पोटात पाणी साचले होते. न्यूमोनिया जडला होता. रक्तातील ऑक्सिजनची मात्रा घटून ९० टक्क्यांखाली घसरली होती. रक्त गोठण्याची प्रक्रिया जलद झाल्याने रक्ताच्या गाठी होण्याचा आणि त्यामुळे इतर महत्त्वाच्या अवयवांच्या निकामी होण्याची शक्यता बळावली होती. अनियमित हृदय गती आणि रक्तदाब, तसेच अंतर्गत रक्तस्रावामुळे देवगावचे बालक गंभीर स्थितीत होते. योग्य निदान आणि न डगमगता डॉ. दरवडे यांनी केलेल्या उपचारांनंतर आठवड्यानंतर संबंधित बालक सुखरूप घरी गेले आहे. 

वाचा- वडीलांच्या दुःखातून सावरत नाही तोच आईही गेली

मल्टी सिस्टिम इंफ्लामेटरी सिन्ड्रोम या दुर्मिळ आजारावर धुळ्यात झालेल्या यशस्वी उपचारांमुळे पुणे, मुंबईच्या तज्ज्ञांनी शाबासकीची थाप दिल्याने उत्साह बळावला आहे. देवगावच्या पालकांनी समाधान व्यक्त केले. सप्टेंबरपासून आतापर्यंत या आजाराचे सहा रुग्ण बरे झाल्याने आत्मविश्वास उंचावला आहे. 
-डॉ. अभिनय दरवडे, बालरोगतज्ज्ञ, धुळे

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image