विद्यार्थी रमलेत शाळा बाहेरच्या शाळेत 

जगन्नाथ पाटील
Thursday, 30 July 2020

राज्यातील नामांकित प्रथम संस्था आणि नागपूर अ आकाशवाणीने ‘शाळा बाहेरची शाळा’ हा उपक्रम सुरु केला आहे. यात धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागाची संधी मिळत आहे.

कापडणे : ‘हॅलो कोण बोलतय…, मी मानसी बोलतेय. हो का...बेटी तुझा अभ्यास कसा सुरु आहे…, एकदम झक्कास...प्रथमने दिलेला अभ्यासने अभ्यासात आता मन छान रमायला लागले आहे...अस वाटत मी शाळेतच बसलेय...’ आता तर छान गाणे, गप्पा गोष्टीही सुरु झाल्या आहेत. त्यामुळे अभ्यासा बरोबर धम्माल मस्तीही सुरू झालीय. हा संवाद आहे; धनूर (ता. धुळे) येथील जिल्हा परिषद शाळेतील तिसरीतील मानसी सैंदाणे आणि प्रथम वाहिनीची आरजे मीस रेश्मा आणि स्वीत्तीम प्रीतचा...! 

राज्यातील नामांकित प्रथम संस्था आणि नागपूर अ आकाशवाणीने ‘शाळा बाहेरची शाळा’ हा उपक्रम सुरु केला आहे. यात धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागाची संधी मिळत आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था प्रथमने शैक्षणिक अॅप विकसित केलेले आहे. त्याच्या माध्यमातून प्रभावी अभ्यास सुरु आहे. 
पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्वच विषयांचा समावेश आहे. दररोज सर्वच विषयांचा अभ्यास करून घेतला जात आहे. अभ्यासमाला आणि स्वाध्यायमालाबरोबर मनोरंजनात्मक खेळ हे बौद्धिक क्षमता विकसित करीत आहेत. जिल्ह्यातील हजारावर आणि राज्यातील लाखभर विद्यार्थी या शैक्षणिक उपक्रमात सहभागी झाले आहेत. 
दरम्यान शिक्षणाधिकारी मनीष पवार, उपशिक्षणाधिकारी मनीषा वानखेडे, गटशिक्षणाधिकारी पी. टी. शिंदे, शिक्षणविस्तार अधिकारी भारती भामरे व राज्य आदर्श शिक्षक सतीश शिंदे यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यातील विद्यार्थी शाळा बाहेरची शाळा या लाईव्ह अभ्यासमालेचा लाभ घेत आहेत. 

विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण दिल्यास ते अभ्यासात रममाण होत असतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित होत असतात. नेमके हेच काम प्रथम आणि आकाशवाणीवरून सुरु आहे. लॉकडाउनमधील शाळा बाहेरची शाळामुळे विद्यार्थी अभ्यासात रमली आहेत. 
-सतीश शिंदे, राज्य आदर्श शिक्षक, धनूर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule student school aakashwani programe