esakal | विजेअभावी धुळ्याचा पाणीपुरवठा विस्कळित; खापर महावितरण कंपनीवर

बोलून बातमी शोधा

watter
विजेअभावी धुळ्याचा पाणीपुरवठा विस्कळित; खापर महावितरण कंपनीवर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेवरील बाभळे (ता. शिंदखेडा) केंद्रात तांत्रिक बिघाडामुळे सकाळी साडेसहाला वीजपुरवठा बंद होता. तो चार ते पाच तासांनंतर पूर्ववत झाला. त्यावेळी सुखवद पाणीपुरवठा केंद्रात वीजपुरवठा डीपी बदलण्यासाठी बंद होता. तो दुपारी चारला सुरू झाला. त्यामुळे नऊ तास विजेअभावी शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

हेही वाचा: काँग्रेसचे आव्हान : भाजपने ‘ते’ १६ कोटी परत द्यावेत, मगच श्रेय घ्यावे

धुळे शहरातील सरासरी ६० ते ७० टक्के पाणीपुरवठा तापी योजनेवरून होतो. पुरवठा आठ ते दहा दिवसांनंतर होत असल्याबाबत नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. त्यावर स्थायी समिती सभापती संजय जाधव यांनी नियोजनावर लक्ष केंद्रित केले व यंत्रणेला उपाययोजनांचा आदेश दिला. विलंबाने होणारा पाणीपुरवठा नियंत्रित करून शहरात सरासरी चार ते पाच दिवसाला तो होत आहे. मात्र, सुखवद व बाभळे केंद्रावर शुक्रवारी नऊ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला.

हेही वाचा: महापालिका कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित जायेना

एक्स्प्रेस फिडरच्या सुविधेमुळे वीज कंपनीला पाणीपुरवठ्यापोटी दरमहा सुमारे सरासरी एक कोटी रुपयांचे बिल दिले जाते. एक्स्प्रेस फिडरव्दारे विजपुरवठा अखंडित सुरू ठेवणे कंपनीला बंधनकारक आहे. यात तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी फिडरवरून कंपनीने वीजपुरवठा सुरू करणे गरजेचे आहे. याप्रश्‍नी महापालिकेने वेळोवेळी वरिष्ठस्तरावर पत्र व्यवहार केला. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. तरीही सदोष वीजपुरवठ्याच्या कारणाने शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडते. नागरिकांच्या तक्रारी वाढतात. ते लक्षात घेत महावितरण कंपनीने महापालिकेस आवश्यक ते सहकार्य करावे. अन्यथा, नागरिकांना कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागते, असे प्रशासनाने म्हटले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे