‘अमरावती’च्या पाण्यामुळे बंधारे ओव्हर फ्लो 

सदाशिव भलकार
Monday, 12 October 2020

अमरावती धरण दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरले. खरीप हंगामाचे फारसे उत्पादन येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना नाही. रब्बी हंगाम फुलण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.

दोंडाईचा : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती मध्यम प्रकल्प यंदाही पूर्ण क्षमतेने भरला आहे. गेल्या आठवड्यात उजव्या व डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तलाव, नाल्यांवर बांधलेले सर्वच बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत. शेतशिवारातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. यामुळे रब्बी हंगाम चांगलाच बहरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

वाचा- धुळ्यातील‘अमृत' मधील उद्यानांची अवस्था; ‘हरित' नव्हे‘चराई‘क्षेत्र विकास !

यंदा परतीच्या पावसाने अमरावती धरण दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरले. खरीप हंगामाचे फारसे उत्पादन येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना नाही. रब्बी हंगाम फुलण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. अनेक वर्ष दुष्काळाचे चटके सहन करणारा शेतकरी आतातरी सुखावेल, अशी अपेक्षा आहे. रब्बीची सर्व मदार अमरावतीच्या पाण्यावर आहे. त्याचे योग्य नियोजन झाले पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सध्या खरीप हंगामाचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. या भागात कापसाची मोठी लागवड झाली आहे. महागडी बी-बियाणे, रासायनिक खते, फवारणी करून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी भांडवल अडकविले आहे. कापसाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. किमान सहा ते सात हजार रुपये भाव कापसाला मिळाला पाहिजे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

आवश्य वाचा- नंदुरबार जिल्ह्यातील चोवीस हजारांवर शेतकऱ्यांचा डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी 
 

दरम्यान, मजुरांचीही तीव्र टंचाई जाणवत आहे. वाढीव रोजंदारीने बाहेरगावाहून मजुरांना आणावे लागत आहे. वेळेवर वेचणी न झाल्यास कापसाचे वजन घटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे वाढीव रोजंदारीने मजूर उपलब्ध करून वेळेवर कापूस काढण्याची लगबग सुरू आहे. लवकरच कापसाचे पीक खाली करून उन्हाळी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. अमरावती नदीवरील बंधारे सध्या ओवर फ्लो झाले आहेत. त्यामुळे रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dondaecha ‘small dams overflow due to water from 'Amravati' dam