
फौजदारी पात्र कट रचून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृत मोहन मराठे यास दोंडाईचा शहादा रोडवरील पीरबल्लीजवळ रस्त्यावर अपघात होईल, अशा पद्धतीने टाकून दिले होते.
दोंडाईचा (धुळे) : येथील पोलिसांच्या ताब्यातील मोहन सदाशिव मराठे (वय ४५) यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी शुक्रवारी (ता. ११) तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्यासह अन्य तीन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत धुळ्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधीक्षक रविकिरण तुकाराम दरवडे यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दोंडाईचा येथील संत कबीरदासनगर येथील रहिवासी असलेले मोहन सदाशिव मराठे यास दोंडाईचा पोलिसांनी तांदूळ चोरी प्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. दरम्यान मोहन मराठेंचा मृत्यू संशयास्पद असल्याने सीआयडी चौकशी सुरू होती. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड, पोलिस कॉन्स्टेबल वासुदेव जगदाळे, सीताराम दामू निकम, राहुल सोनवणे यांनी गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी बेकायदेशीर रखवालीत ठेवून मोहन मराठे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. तसेच फौजदारी पात्र कट रचून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृत मोहन मराठे यास दोंडाईचा शहादा रोडवरील पीरबल्लीजवळ रस्त्यावर अपघात होईल, अशा पद्धतीने टाकून दिले होते.
हेही पहा- ब्राह्मणाचे मंगलाष्टकातील ‘सावधान’ अन् ते होतात तयार
आईला मृतदेह दिल्याचा खोटा पुरावा
मानवी शवाची अप्रतिष्ठा केली. तसेच मोहन यास आईच्या ताब्यात दिल्याचे खोटे पुरावे तयार केले. गुन्ह्याची माहिती कायदेशीरपणे त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नाही, म्हणून त्यांच्याविरुद्ध सरकारतर्फे फिर्यादी होऊन दोंडाईचा पोलिस ठाण्यात सीआयडी धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक रविकिरण दरवडे यांनी फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे.
सीआयडीने केले उघड
या गुन्ह्याचा पुढील तपास नंदुरबार येथील सीआयडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र भावसार यांच्याकडे सोपविला आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. भावसार तपास करीत आहेत. वासुदेव जगदाळे, सीताराम निकम, राहुल सोनवणे या तीन जणांना शुक्रवारी (ता. ११) अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली.
संपादन ः राजेश सोनवणे