72 दिवसांनंतर येथे झाला "कोरोना'चा शिरकाव 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

लॉकडाउन'दरम्यान किरकोळ व्यावसायिकांना काही ठराविक वेळेत शिथिलता दिली होती. मात्र कोरोनाबाधित आढळल्याने आज सकाळपासून संपूर्ण शहर निर्मनुष्य झाले. नागरिकांनीही घरातच राहणे पसंत केले व व्यवहार ठप्प झाले. 

दोंडाईचा : शहरातील राणीपुरा सुराय नाला परिसर व डालडा मिल घरकुल परिसरातील दोन रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने अखेर "कोरोना'ने तब्बल 72 दिवसांपर्यंत सुरक्षित असणाऱ्या दोंडाईचा शहरात शिरकाव केला. शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. प्रशासकीय यंत्रणा पहाटेपासून उपाययोजनेसाठी दाखल झाली. "लॉकडाउन'दरम्यान किरकोळ व्यावसायिकांना काही ठराविक वेळेत शिथिलता दिली होती. मात्र कोरोनाबाधित आढळल्याने आज सकाळपासून संपूर्ण शहर निर्मनुष्य झाले. नागरिकांनीही घरातच राहणे पसंत केले व व्यवहार ठप्प झाले. 

आवर्जून वाचा - आईच्या मृत्यूचे दुःख नाही...त्यांना हवेत मृतदेहावरील दागिने; भावांची मारामारी 

कंटेन्मेंट, बफर झोन घोषित 
येथील राणीपुरा भागातील 49 वर्षीय महिला, तर डालडा मिल घरकुल भागातील 42 वर्षीय पुरुषाचा अहवाल "कोरोना' पॉझिटिव्ह आला. त्याच्या निवासस्थानापासून दीड किलोमीटर परिसर कंटेन्मेंट क्षेत्र व त्यास लागून साडेतीन किलोमीटर क्षेत्र बफर झोन घोषित केला. "लॉकडाउन' काळात अत्यावश्‍यक सेवा जसे- किराणा साहित्य, भाजीपाला, रुग्णालये, औषधालयांची आवश्‍यकता असल्यास यंत्रणेमार्फत पुरवठा मागणीनुसार सशुल्क करण्यात येईल. शहरातील आतील काही रस्ते "सील' केले आहेत. परिसरात पालिकेतर्फे औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. 

क्‍लिक करा - जि.प.चे ठरले...एका बाकावर एकच विद्यार्थी

सर्वेक्षणासाठी 10 पथके 
रुग्णाच्या संपर्कातील 15 जणांना उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. त्याचे स्वॅबचे नमुने घेऊन धुळे येथे पाठविले जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणप्रमुख तथा अपर तहसीलदार सुदाम महाजन यांच्या आदेशावरून आजपासून 14 दिवसांकरिता संपूर्ण "संचारबंदी' लागू केली आहे. बाधित क्षेत्रातील घर, परिसराचे सर्वेक्षणासाठी दहा पथके तयार केली आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे, आवश्‍यक त्या उपाययोजना करणे यासाठी पालिका, पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. 

स्थितीवर लक्ष ठेवून 
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्रमुख महाजन, मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मोरे, मंडलाधिकारी महेशकुमार शास्त्री, शिंदखेडा कोविड केअर सेंटरचे डॉ. हितेंद्र देशमुख, पालिका आरोग्य निरीक्षक शरद महाजन, दोंडाईचा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष लोले, अभियंता शिवनंदन राजपूत, तलाठी एस. एस. पाटील, विशाल गारे, दीपक भगत आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dondhaicha first corona positive case 72 deys