‘ग्रीन झोन’ शहाद्यात ‘कोरोना’ आला कसा? 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

कोरोना’ने शहाद्यात प्रवेश कसा केला? याचे गूढ अद्याप कायम आहे. स्थानिक नागरिकांच्या धुळे, मालेगाव, सुरत ‘कनेक्शन’च्या विविधांगी चर्चा शहरात आहेत. 

शहादा : एकीकडे शहरातील ‘कोरोना’ संक्रमित संशयितांचे अहवाल प्राप्त होत आहेत; तर नव्याने माहीत झालेल्या ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासन घेत आहे. मात्र, ‘कोरोना’ने शहाद्यात प्रवेश कसा केला? याचे गूढ अद्याप कायम आहे. स्थानिक नागरिकांच्या धुळे, मालेगाव, सुरत ‘कनेक्शन’च्या विविधांगी चर्चा शहरात आहेत. 

नक्‍की पहा- "युद्ध' कोरोनाप्रमाणेच अपुऱ्या मनुष्यबळाशीही! 

जिल्हा रुग्णालयात शहाद्यातील १९ मार्चला दाखल झालेल्या तिघांपैकी दोघांना ‘कोरोना’ संसर्ग झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला २१ मार्चला प्राप्त झाला; तर दोघांपैकी ३२ वर्षीय तरुणाचा २२ मार्चला मृत्यू झाला. ‘कोरोना’सदृश आजाराची लक्षणे आढळल्याच्या चौथ्या दिवशी एकाचा मृत्यू झाला; त्याबरोबर शहादा ‘हाय ॲलर्ट’वर गेले. त्या काळात मृत युवक केळी व्यापारी होता. त्याच्याशी संपर्कात आलेल्यांचा शोध मोबाईल लोकेशनच्या मदतीने सुरू झाला. तो राहत असलेल्या प्रभाग सातमधील संपर्कात आलेले कुटुंब, नातेवाइकांसह त्याच्यावर उपचार करणाऱ्या तीन डॉक्टरांना ‘क्वारंटाइन’ करण्यात आले. आतापर्यंत २९ पैकी २६ जणांचा संशयित तसेच ‘हाय कॉन्टॅक्ट रिस्क’ असलेल्या व्यक्तींचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यात चार रुग्ण ‘कोरोना’बाधित असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे; तर अन्य तीन व्यक्ती नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

घेतली जातेय काळजी 
आतापर्यंत चार बाधित रुग्णांच्या अतिनिकट संपर्कात आलेल्या ५९ व्यक्तींचा शोध घेतला आहे; तर दूरस्थ संपर्कात असलेल्यांना तपासून ‘होम क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. मृत केळी व्यापाऱ्याच्या संपर्कातील ग्रामीण भागातील व्यक्तींचे सर्व प्राप्त अहवाल ‘निगेटिव्ह’ आहेत; तर ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळून आलेल्या प्रभाग क्रमांक सात व चारमध्ये सक्रिय पाळत ठेवण्यात येत आहे. उच्च जोखीम संपर्कात आलेल्यांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. 

वेगवेगळे तर्कवितर्क 
प्रशासनाने शहरातील प्रभाग क्रमांक सात परिसर ‘सील’ केला. दोघांचा अहवाल ‘कोरोना’बाधित आला. यावेळी दाट लोकवस्ती असलेली गरीब नवाज कॉलनी केंद्रबिंदू ठरली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. शहरात ‘कोरोना’ कसा दाखल झाला, याबाबत चर्चा सुरू झाली. ‘कोरोना’चे ‘कनेक्शन’ कधी मालेगाव, कधी धुळे, तर कधी सुरतशी जोडले जात आहे. काहींनी केळी भरण्यासाठी आलेल्या ट्रॉलावरील चालक व क्लीनरकडेही अंगुलीनिर्देश केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news green zone shahada corona virus