"अमृत'चं खोदकाम.. बुजविण्यासाठी दोन महिने थांब..! 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 मार्च 2020

दीड- दोन महिन्यांपासून या प्रचंड वर्दळ असलेल्या प्रमुख मार्गावर तीन ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यातून निघालेली माती, मुरूम रस्त्यावरच बाजूला ढीग करून ठेवण्यात आला असून, वाहनधारकांना वापरण्यासाठी रस्ताच शिल्लक नाही.

जळगाव : शहरात "अमृत' योजनेंतर्गत सुरू असलेले खोदकाम नागरिकांसाठी अत्यंत त्रासदायक तर काही ठिकाणी जीवघेणे ठरत आहे. जलवाहिनीसाठी खोदकाम केल्यानंतर चारी, खड्डा त्वरित बुजविण्याबाबत स्पष्ट सूचना असताना कंत्राटदार त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. महाबळ बसथांब्यापासून पुढे प्रमुख रस्त्यावर तीन ठिकाणी "अमृत'साठी खोदून ठेवलेले मोठमोठे खड्डे गेल्या दोन महिन्यांपासून तसेच असून, त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वापरावे लागत आहे. 
संपूर्ण शहरातील रस्त्यांची "अमृत' योजनेच्या कामामुळे वाट लागलेली असताना महाबळ परिसरातील रस्ते त्याला अपवाद कसे ठरू शकतील? काव्यरत्नावली चौक ते महाबळ बसथांब्यापर्यंतच्या रस्त्यावर जलवाहिनीचे काम खूप उशिराच्या टप्प्यात सुरू झाले. साधारण दीड- दोन महिन्यांपूर्वी हे काम सुरू होऊन जलवाहिनी टाकूनही झाली. महाबळ थांब्यापासून पुढे त्र्यंबकनगर शाळेपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. 

नक्की वाचा :  होय....जळगावातही "सोलापुरी पॅटर्न' राबवूच ः जिल्हाधिकारी, प्रभारी आयुक्त डॉ. ढाकणे 

जीवघेणे खड्डे तसेच! 
दीड- दोन महिन्यांपासून या प्रचंड वर्दळ असलेल्या प्रमुख मार्गावर तीन ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यातून निघालेली माती, मुरूम रस्त्यावरच बाजूला ढीग करून ठेवण्यात आला असून, वाहनधारकांना वापरण्यासाठी रस्ताच शिल्लक नाही. जलवाहिनी टाकून झाल्यानंतर दोन महिने हे खड्डे बुजले जात नसतील तर कंत्राटदार नेमके काय करतोय? आणि महापालिका प्रशासन त्यावर कितपत लक्ष ठेवून आहे? असा प्रश्‍न आहे. 

आर्वजून पहा : सापडलेल्या एक लाख रूपयांच्या बॅगसोबतचा प्रवास...पांडूरंगाच्या दर्शनापेक्षाही... दिले याला प्राधान्य 
 

उपरस्त्यांमध्येही खड्डे 
गेल्या महिनाभरातच महाबळ परिसरातील नागेश्‍वर कॉलनी, मकरंदनगर आदी भागात उपरस्त्यांवर जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले. काही रस्ते जलवाहिनी टाकून बुजण्यात आले, मात्र त्याची लेव्हल व्यवस्थित केलेली नाही. तर काही उपरस्त्यांवरही अनेक ठिकाणी खोदून ठेवलेले काम तसेच पडून आहे. ते बुजण्यात आलेले नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच पंचाईत होत आहे. 

लहान-मोठे अपघात 
लहान मुले, शालेय विद्यार्थी, वृद्धांना या ओबडधोबड रस्त्यांवरून चालणेही कठीण जात असून, लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले आहे. शिवाय, या व प्रमुख रस्त्यांचे पॅचवर्क न केल्यामुळे प्रचंड धूळ परिसरात उडत आहे. हे खड्डे तातडीने बुजून, रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon aamrut yojna work delaeted, deadly pits on major routes.