जळगाव : एरवी कुणालाही शक्य झाले नाही ते "कोरोना' संसर्गाने शक्य करून दाखविले. दीड महिन्यांपूर्वी अमृत योजनेतील कामे व त्यामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेने शहर "धूळगाव' होऊन बसले होते.. ते "लॉकडाउन'मुळे पुन्हा जळगावच्या वाटेवर आले. धूळ व धुलिकणांचा स्तर पन्नास टक्क्यांपेक्षा कमी झाला असून, वाहनांच्या मर्यादित वापरानेही प्रदूषणाचा स्तर 50 टक्क्यांपर्यंत घटला आहे..
पर्यायाने जळगावची हवा पवित्र व शुद्ध बनलीय..
"कोरोना' संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन जारी करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 14 एप्रिलपर्यंत, नंतरच्या दुसऱ्या टप्प्यात 3 मेपर्यंत आणि "लॉकडाउन-3'चा कार्यकाळ 17 मेपर्यंत वाढविण्यात आला. परिणाम, 24 मार्चपासून संपूर्ण देश थांबला आहे, सर्व वाहनांची चाके जागच्या जागी आहेत. याचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसतेय. प्राणी, पक्षी आपापल्या क्षेत्रात मुक्त संचार करताना दिसताहेत.. तर निसर्गानेही आपले रंगरूप बदलल्याचे जाणवत आहे.
प्रदूषणाचा स्तर घटला
जळगाव शहरातील प्रदूषणाचा स्तर या "लॉकडाउन'मुळे कमालीचा घटला आहे. शहरातील प्रदूषणाच्या स्तराची एमआयडीसी, बीजे मार्केट व गिरणा टाकी परिसरात नोंद होत असते. 24 मार्चपासून एमआयडीसीतील 90 टक्के कंपन्या बंद असल्याने त्या भागातील प्रदूषण 50 टक्क्यांनी घटले आहे. तसेच बी.जे. मार्केट व गिरणा टाकी परिसरातील स्तरही घटला आहे. प्रदूषणाचा स्तर अभ्यासण्यासाठी सल्फरडाय ऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड या वायूंचे प्रमाण अभ्यासले जाते. सल्फरडाय ऑक्साईडचा सरासरी स्तर एरवी 16 ते 19च्या दरम्यान असतो, तो या काळात 8 ते 9 एवढा नोंदला गेला. तर नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण एरवी सरासरी 40-45च्या दरम्यान असते, ते 19च्या टप्प्यात आहे.
धूळही जमिनीवर
जळगाव शहरात गेल्या दोन-अडीच वर्षांपासून अमृत योजनेचे काम सुरू असून, त्यासाठी शहरातील बहुतांश रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत, तर अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातून धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. धूळीशिवायही धुलिकणांचा स्तरही वातावरणात असतो. त्यांचेही प्रमाण निम्म्यावर आले आहे. शहरात नोंद होणाऱ्या तीनही ठिकाणांवर धूळ व धुलिकण या दोघा घटकांचा सरासरी स्तर निम्म्यावर आला आहे. वातावरणातील धुलिकणांचे (पीएम-10) प्रमाण एरवी 70-80च्या दरम्यान असते, ते सध्या 37 ते 44च्या टप्प्यात आहे. तर प्रत्यक्ष धूळीचे (एसपीएम) सरासरी प्रमाण 90-110 असते, ते घटून 47 ते 55च्या टप्प्यात मर्यादित आहे.
असा आहे प्रदूषणाचा स्तर (सरासरी)
घटक-----------------"लॉकडाउन' आधी------सध्याचा स्तर
सल्फरडाय ऑक्साइड-----16 ते 20---------8 ते 9
नायट्रोजन ऑक्साइड------40 ते 45--------19 ते 21
धुलिकण -----------------80 ते 90-------35 ते 45
धूळ---------------------95 ते 110-------45 ते 55