सांख्यशास्त्र जनकांच्या तपोभूमीत विद्यार्थ्यांकडून वेदाभ्यास 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथील विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न सुरू आहेत, मंदिरातर्फे महर्षी दधिची वेदपाठशाळेची स्थापना करण्यात आली आहे. यातून उद्याचा समृद्ध आणि संस्कारी व्हावा हीच तळमळ आहे. 
महंत श्री महामंडलेश्वर स्वामी हंसानंद महाराज 
अध्यक्ष, श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट, नीम (ता. अमळनेर) 

 

जळगाव  : अमळनेर तालुक्‍यातील नीम शिवारातील पांझरा, तापी या नदीच्या पवित्र संगमावर प्राचीन तीर्थ असलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर. 11 व्या शतकातले अतिप्राचीन जागृत देवस्थान आहे. भव्य आणि पुरातन हेमांडपंथी शिव मंदिर म्हणून याचा विशेष लौकिक आहे. कपिल मुनींना सांख्यशास्त्राचे जनक, प्रवर्तक मानले जाते. त्यांच्या या तपोभूमीत सध्या वेदशास्त्राच्या विधिवत ज्ञानाचा मंत्रोच्चारही घुमत आहे. 

विविध धार्मिक ग्रंथात उल्लेख असलेल्या श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे पुरातन काळापासून तप, यज्ञकर्म, आदींची कपिलमुनींनी सुरवात करून काही काळ तपश्‍चर्या आणि नामसाधना या ठिकाणी केली त्यावेळी कपिला गाय देखील येत असे त्यावरून श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरातील त्रिपिंडी महादेवाच्या मुर्त्यांची स्थापना केल्याचा इतिहास येथील शिलालेखात आढळतो. 

अशी आहे रचना 
संस्कृत आणि मोडी लिपीत दीपमाला व मंदिराच्या तटरक्षक भिंतीवर लिहिलेले शिलालेख आजही दिसून येतात. मंदिर पूर्ण काळ्या पाषाण दगडात असून 18 दगडी खांबांवर मोठा सभामंडप व त्यावर तीन घुमट व एक मध्यभागी घुमट असे पूर्वाभिमुख मंदिर आहे. सकाळी सूर्यकिरणांकडून महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले जाते हा विलक्षण अनुभव काहीकाळ भाविकांना अनुभवता येतो. महाशिवरात्री निमित्ताने याठिकाणी मोठी यात्रा भरते. मंदिर व्यवस्थेवर अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी हंसानंद महाराज, सचिव मगन पाटील आदींसह अन्य सदस्य लक्ष ठेवून आहेत. 

आर्वजून पहा : दुर्दवी दुर्घटना...! सुटले नियंत्रण अन्‌ कोसळे पन्नास फुट खोल दरीत 
 

कपिल मुनींचे वास्तव्य 
कपिल हे सांख्य दर्शनाचे प्रवर्तक होते. उपनिषदात उल्लेख केलेल्या सिद्धांताचे यांनीच प्रथम शास्त्रीय विवेचन केले आणि सांख्य दर्शनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली म्हणून कपिलमुनींना आदिविद्वान असे म्हणतात. आपल्या वास्तव्यादरम्यान याच ठिकाणी त्यांनी शिवाची उपासना करत अंशरूपाने विराजित व्हावे अशी विनंती केली. स्कंद पुराणात उल्लेख असलेल्या भारतातील 108 शिवमंदिरांपैकी हे एक असल्याचा उल्लेख आढळतो. 

नक्की वाचा : राज्यपाल म्हणाले...टेस्ट बहुत मिठा है 
 

विद्यार्थ्यांचा वेदाभ्यास 
मंदिर परिसरातच नव्या पिढीला वेदशास्त्राचे संस्कार मिळावे म्हणून महामंडलेश्वर स्वामी हंसानंद महाराज यांच्या संकल्पनेतून पाठशाळा चालविण्यात येते. सध्या 35 विद्यार्थी या पाठशाळेत वेदशास्त्राचे अध्ययन करीत आहेत. सोबतच विद्यार्थ्यांना शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमातील आवश्‍यक शिक्षण परिसरातील निवृत्त शिक्षक देत आहेत. महाराष्ट्रात पहिले अखिल भारतीय संत संमेलनाचे श्री क्षेत्र कपिलेश्वर येथील महंत श्री महामंडलेश्वर स्वामी हंसानंद महाराज यांच्या पुढाकाराने 2009 दरम्यान आयोजन करण्यात आले. यामुळे या देवस्थानाला विशेष ओळख प्राप्त झाली आहे. 

क्‍लिक कराः  सत्तापालट होऊनही मुख्यमंत्री म्हणून फडणवीस कायम...!
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon amelner kapileshwar tempal news