कन्टेमेंट झोनमध्ये वाटणार "आर्सेनिक अल्बम'च्या गोळ्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

कोरोनावर औषध म्हणून नव्हे, तर कोरोना व त्यासारखे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढीच्या या गोळ्या आहेत, ​

जळगाव  : कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत असताना बाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसरात, म्हणजेच कन्टेमेंट झोनमध्ये "आर्सेनिक अल्बम- 30' या होमिओपॅथीच्या गोळ्या मोफत वाटपाचा उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार असून त्या माध्यमातून लाखो कुटुंबांपर्यंत गोळ्यांचा पुरवठा केला जाईल. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत अन्य सेवाभावी संस्थांनीही मदतीचा हात देऊ केला आहे. 

आर्वजून पहा : जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आलेख वाढतोय 
 

शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी होमिओपॅथीतील आर्सेनिक अल्बम- 30 या गोळ्या उपयुक्त मानल्या जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, "आयुष'सह राज्यातील आरोग्य विभागानेही या गोळ्या घेण्याचे सुचविले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर या गोळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यामुळे काही व्यावसायिकांनी त्याच्या किमतीही प्रचंड वाढविल्या आहेत. त्यातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. 

प्रशासनाकडून वाटप 
त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या गोळ्या मोफत वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा प्रशासन व काही स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने या गोळ्या व औषध मागविण्यात आल्या असून त्या कन्टेमेंट झोनमधील कुटुंबांना वाटण्यात येणार आहे. जवळपास दीड- दोन लाख कुटुंबांना पुरतील, एवढ्या गोळ्यांचे वाटप होणार आहे. 

क्‍लिक कराः तरुणाने "कोरोना'वर केली मात... दहाच दिवसांत "ओके',  पुष्पवृष्टीने स्वागत 
 

औषध मागविले सुरतहून 
शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी (immunity) होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्ब हे औषध उपयुक्त असून, त्याचाही पुरवठा आता कमी पडतोय. या पार्श्‍वभूमीवर जळगावातील होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. रितेश पाटील यांनी हे औषध सुरतहून मागविले असून ते प्रशासनाला उपलब्ध करून दिले आहे. केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर अन्य ठिकाणीही ही औषधी पाठविण्यात येणार आहे. 

अशी घ्यावी औषधी 
आर्सेनिक अल्बम औषध टाकून दिलेल्या या पाच गोळ्या दररोज उपाशी पोटी घ्याव्यात. असे तीन दिवस करावे. गोळ्या घेण्याआधी व नंतर किमान अर्धातास काही पिऊ नये, खाणेही टाळावे. गोळ्यांचा डोस पूर्ण होईपर्यंत तीन दिवस कॉफी, कच्चा कांदा वर्ज्य. कोरोनावर औषध म्हणून नव्हे, तर कोरोना व त्यासारखे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढीच्या या गोळ्या आहेत, असे डॉ. रितेश पाटील यांनी सांगितले. या गोळ्यांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचा दावाही त्यांनी केला. 

नक्की वाचा : जमिनी वनखात्याच्या, निर्णय घेणारी यंत्रणा महसूलची

"अर्सेनिक अल्बम-30' जादा दराने विकल्यास कारवाई 
"कोरोना' पासून बचावासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी "अर्सेनिक अल्बम-30' या होमिओपॅथी औषधांची विक्री होत आहे. 80 ते 100 गोळ्या असलेली एक बॉटल जास्तीत जास्त 11 रुपयांपर्यंत विक्री करणे अपेक्षित आहे. त्यापेक्षा जादा दराने विक्री केल्याचे आढळल्यास संबंधित औषध विक्रेत्यांवर कारवाई करू, असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे परिस्थिती नियंत्रक गोरक्ष गाडीलकर यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "Arsenic album" tablets will be found in the condom zone