तीन महिने फरार माजी महापौर कोल्हे अखेर अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

बांधकाम व्यावसायिक असलेले खुबचंद साहित्या यांच्या मुलाच्या नावावरील चारचाकी गाडी माजी महापौर ललित कोल्हे यांना दिली होती. ही चारचाकी परत मागितल्यानंतर कोल्हे यांनी देण्यास टाळाटाळ केली. त्याचप्रमाणे कोल्हे यांनी साहित्या यांच्याकडून खंडणी मागितली.

जळगाव : शहरातील बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर 16 जानेवारीला प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणातील प्रमुख संशयित माजी महापौर ललित कोल्हे यांना आज रात्री दहाच्या सुमारास अटक करण्यात आली. जळगाव स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने ही कारवाई केली. 

आवर्जून वाचा - म्हणून प्राध्यापकच म्हणू लागला "मै हू डीन'
 

शहरातील गोरजाबाई जिमखान्यात झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात खुबचंद साहित्य गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह राकेश चंदू आगरिया (वय 22, रा. वाघनगर), नीलेश ऊर्फ बंटी नंदू पाटील (वय 24, रा. फागणे, धुळे), नरेश चंदू आगरिया (वय 24, रा. वाघनगर), गणेश अशोक बाविस्कर (वय 25, रा. तुरखेडा, जळगाव), प्रवीण देविदास कोल्हे आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रमुख संशयित ललित कोल्हे गेल्या चार महिन्यांपासून फरार होते. त्याच्या शोधार्थ पोलिसांनी पथके देखील रवाना केली होती. दरम्यान, ललित कोल्हे जळगावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहम यांनी त्यास आज रात्री अटक केली. दरम्यान, या गुन्ह्यातील उर्वरित संशयिताना यापूर्वीच अटक झाली आहे. अटकेतील संशयितांतर्फे जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर जामीन मंजूर व्हावा, अशी मागणी संशयितांकडून करण्यात आलेली होती. न्या. एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयाने मंगळवारीच संशयितांना जामीन अर्ज नाकारला आहे.

या प्रकरणात झाली अटक 
जळगाव शहरातील बांधकाम व्यावसायिक असलेले खुबचंद साहित्या यांच्या मुलाच्या नावावरील चारचाकी गाडी माजी महापौर ललित कोल्हे यांना दिली होती. ही चारचाकी परत मागितल्यानंतर कोल्हे यांनी देण्यास टाळाटाळ केली. त्याचप्रमाणे कोल्हे यांनी साहित्या यांच्याकडून खंडणी मागितली. या प्रकारानंतर म्हणजे 16 जानेवारी 2020 रात्री साडेआठच्या सुमारास गोरजाबाई जिमखाना येथे साहित्या गेले असता ललित कोल्हे यांच्यासह पाच- सहा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पिस्तूलचा धाक दाखवत लाकडी दांड्याने मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला होता. यात साहित्या गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदरच्या घटनेनंतर ललित कोल्हे हे तीन महिन्यांपासून फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ललित कोल्हेंवर पाळत ठेवत असताना कोल्हे हे रामानंदनगर परिसरात आल्याच्या माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून कोल्हे यांना ताब्यात घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bjp ex mayor lalit kolhe arrest