आगामी काळात स्वयंशिस्त पालनच "कोरोना'पासून वाचविणार :जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे 

आगामी काळात स्वयंशिस्त पालनच "कोरोना'पासून वाचविणार :जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे 

जळगावः जिल्ह्यात 17 मेपर्यंत "लॉकडाउन' आहे. त्यानंतर "लॉकडाउन' उठेल की नाही हे आताच सांगता येत नाही. तरीही "कोरोना'चा धोका नाही, असे समजून नागरिक वागत आहेत. येणाऱ्या दिवसांत "कोरोना'चा धोका कायम राहणार असे समजून प्रत्येकाला स्वयंशिस्त पाळूनच दैनंदिन व्यवहार करावे लागतील. शिस्त पाळली तरच आपण "कोरोना'ला हरवू. नागरिक स्वयंशिस्त पाळत नाही, यामुळे "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण अधिक संख्येने सापडत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज "सकाळ'ला विशेष मुलाखतीत दिली. 

ते म्हणाले, की "कोरोना'चे अधिक रुग्ण सापडताहेत, त्यात जे रुग्ण होऊन मृत होताहेत त्यात युवावर्गही आहे. त्याची चिंता आम्हाला आहे. "कोरोना'चा संसर्ग न होऊ देण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळायलाच पाहिजे. गर्दीत न जाणे, तोंडाला मास्क बांधणे, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे हे नियम स्वयंशिस्तीचे आहेत. ते पाळले तर "कोरोना' रुग्णसंख्या वाढणार नाही. मात्र, अनेकवेळा आवाहन करूनही नागरिक काळजी घेत नाही, याचे दुःख आहे. "कोरोनो'चा व्हायरस केव्हा, कोठून येईल हे सांगता येत नाही. 85 टक्के नागरिकांना कोरोना झाला अन्‌ बराही झाला, हे त्यांनाही कळले नसेल. कारण त्यांची "इम्युनिटी' (रोगप्रतिकारशक्ती) अधिक होती. 

जे रुग्ण "कोरोना पॉझिटिव्ह' होऊन येताहेत एकतर त्यांना "कोरोना'ची लक्षणे जाणवू लागली तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. जिल्ह्यात काही रुग्ण "कोरोना' संसर्गाच्या अंतिम टप्प्यात तपासणीसाठी समोर येत आहेत. त्यातून मृत्यूची संख्या वाढलेली दिसते. कोणालाही थोडा जरी त्रास जाणवला तर त्यांनी रुग्णालयात तपासणी करून घेणे हाच पर्याय आहे. जर रुग्णाला अगोदरच काही व्याधी असेल, वय 60 च्या वर असेल तर रुग्ण बरा होण्याची संधी कमी असते. यामुळे लक्षणे दिसू लागलाच तपासणी करणे हा चांगला उपाय आहे. 

मजूरटंचाई जाणवणारच 
"कोरोना' संसर्गामुळे परप्रांतीय मजुरांनी त्यांच्या घराची वाट धरली असली तरी, ज्यांची येथे घरे आहे ते येथेच आहेत. जे मजूर येथे झोपडी करून राहत होते ते घरी जाण्यासाठी निघाले आहेत. बहुतांश मजूर परराज्यात जात आहे. यामुळे सर्वच क्षेत्रात आगामी काळात मजूरटंचाई जाणवेल. मजुरांना आपण घरी राहू, असे वाटत असल्याने ते घरी जाण्यासाठी निघाले आहेत. काहींचे म्हणणे असे होते, की "लॉकडाउन' करण्यापूर्वी परराज्यांतील लोकांना त्यांच्या घरी जाऊ द्यायला हवे होते. मात्र तसे केले असते तर बस, रेल्वेत चेंगराचेंगरीचा धोका होता, असे त्यांनी सांगितले. 

शक्‍यतेच्या पलीकडे जाऊन तपासणी 
अमळनेर, पाचोरा, भुसावळ, जळगावला "पॉझिटिव्ह' रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती (दुसरी फळी), त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीची (तिसरी फळी) तपासणी आम्ही केली. यामुळे "पॉझिटिव्ह' रुग्ण लवकर सापडत आहे. त्यांच्यावर किमान उपचार करून बरे करता येत आहे. दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील संपर्कातील व्यक्तीची तपासणी केली नसती तर त्यांनी अजून "कोरोना' रुग्णसंख्या वाढविली असती. 

खासगी डॉक्‍टरांना आदेश 
"कोविड' रुग्णालयात सेवा देण्यासाठी डॉक्‍टरांची यादी तयार केली आहे. रुग्णालयाच्या गरजेप्रमाणे काही डॉक्‍टरांना रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. "कोरोना' रुग्णांच्या दाखल होण्यापासून तो बरा होईपर्यंत प्रत्येक स्टेपवर माझा पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यात "कोरोना'चे रुग्ण वाढू नयेत यासाठी विविध पातळ्यांवर जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन काम करीत आहे. प्रत्येक क्षणाचा उपयोग जिल्हा वासायांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विविध नियम करीत आहे. ते नियम नागरिकांनी पाळल्यास ते नक्कीच "कोरोना' संसर्गापासून दूर राहतील. 

अधिकाऱ्यांना समन्वयाच्या सूचना 
"कोरोना'ग्रस्तांचे उपचार, तेथील असुविधा आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यातील असमन्वयाबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. सोमवारी (11 मे) पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीतही हा मुद्दा निघाला, त्यावर पालकमंत्री व मीदेखील संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. कामातील समन्वय परिणामातून दिसून येतो, ते सकारात्मक परिणाम समोर येणे आवश्‍यक असल्याचे त्यांना बजावले आहे. मात्र, तरीही त्यांच्या कामात सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com