जिल्ह्यात आठ हजार क्विंटल कापसाची खरेदी- 5350 ते 5450 दरम्यान भाव 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 मे 2020

जिल्ह्यात चार ठिकाणी कापूस खरेदी सुरू आहे. अमळनेर येथील ग्रेडर सेवानिवृत्त झाल्याने दुसरा ग्रेडर नेमला आहे.लवकरच तेथेही कापूस खरेदी सुरू होईल. 
आर. जी. होले, झोनल मॅनेजर 
मार्केटिंग फेडरेशन जळगाव

जळगाव  ः महाराष्ट्र राज्य को.-ऑपरेटिव्ह ग्रोवर्स मार्केटिंग फेडरेशनतर्फे गेल्या 27 एप्रिलपासून आजअखेर पर्यंत आठ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, दर्जाही खालावला होता. यामुळे मार्केटिंग फेडरेशन केवळ चांगल्या दर्जाचा (एफ.ए.क्‍यू.) मालच खरेदी करीत असल्याचे सांगण्यात आले. चांगल्या कापसाला 5350 ते 5450 असा दर देण्यात येत आहे. 

नक्की वाचा ः जिल्ह्यात बारा तासात सहा पॉझिटीव्ह, एकूण 43 रुग्ण 
 

लॉकडाऊनमुळे 24 मार्चपासून जिल्ह्यात कापूस खरेदी बंद होती. अनेक शेतकऱ्यांच्या घरात हजारो किंवटल कापूस पडून होता. 16 एप्रिलला लॉकडाऊनमधून कापूस केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही सी.सी.आय.च्या अधिकाऱ्यांनी मजुरांची अडचण दाखवीत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास असमर्थता दाखविली होती. शेतकऱ्यांचा कापूस घरात पडल्याने लाखों रुपयांचे नुकसान होणार होते. आताजर कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाहीतर मे महिन्यात पाऊस केव्हा येईल व घरातला कापूस घरातच राहील. यामुळे "सकाळ'ने "कापूस उत्पादकांच्या व्यथा' मालिका सुरू करून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याची दखल म्हणून मार्केटिंग फेडरेशनने 27 एप्रिलपासून जिल्ह्यात पाच ठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरू केली. धरणगाव, पारोळा, कासोदा, दळवेल या केंद्रावर दररोज 25 ते 30 गाड्या कापूस खरेदी केला जातोय. 

हेही वाचा ः  लॉकडाऊन वाढवतोय डोळ्यांचा त्रास..मुलांमध्ये अधिक दूष्परिणाम 

ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे त्यांना कोणत्या दिवशी उपस्थित राहावे, याबाबतचा "मेसेज' पाठविण्यात येत आहे. ज्यांनी ऑफलाइन कपाशीची नोंदणी केली आहे त्यांनाही मेसेज पाठविला जाईल. आज शनिवार व उद्या (ता.3) रविवार (पाच दिवसांचा आठवडा) असल्याने ही केंद्रे बंद होती. सोमवारपासून कापूस खरेदी केंद्रे पूर्ववत सुरू राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cotton purchesing five thousand four hundred fifty rate