"लॉकडाउन'चा परिणाम..विजेच्या मागणीत तब्बल तीनशे मेगावॉटने घट! 

"लॉकडाउन'चा परिणाम..विजेच्या मागणीत तब्बल तीनशे मेगावॉटने घट! 

जळगाव ः असह्य उन्हाळा सुरू झाला, की विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत असते. उष्ण झळांपासून बचाव करण्यासाठी एसी, कुलर, पंख्यांचा वापर वाढत असल्याने विजेचा तेवढा वापर वाढत असतो. दरवर्षी उन्हाळ्यात खानदेशात बाराशे मेगावॉटपर्यंत पोचणारी विजेची मागणी यंदा मात्र तीनशे मेगावॉटने कमी झाल्याने "महावितरण'वर पडणारा अतिरिक्‍त विजेचा भार यंदाच्या "लॉकडाउन'मध्ये अद्याप जाणवलेला नाही. 

"महावितरण'कडून घरगुती, औद्योगिक, कृषी आणि व्यावसायिकांना सिंगल फेज व थ्री फेजमध्ये वीजपुरवठा करण्यात येत असतो. साधारणपणे मार्चपासून चारही घटकांमधून विजेच्या मागणीत वाढ असते. जिल्हा किंवा परिमंडळांत अतिरिक्‍त विजेची मागणी झाल्यास त्याचा भार पडल्याने "महावितरण'कडून वेगवेगळ्या टप्प्यांत भारनियमन सुरू करण्यात येत असते. यंदा मात्र "कोरोना व्हायरस'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्चपासून देशात आणि राज्यात "लॉकडाउन' सुरू झाला आहे. तेव्हापासून विजेची मागणी कमीच होत आली आहे. यामुळे "महावितरण'वर उन्हाळ्यात जाणवणारा अतिरिक्‍त भार यंदा मात्र जाणवत नसल्याचे चित्र आहे. 

चारशे मेगावॉट कमी 
उन्हाच्या झळा जाणवत असताना यातून सुटका करण्यासाठी एसी, कुलरचा अगदी सर्रासपणे वापर करण्यात येत असतो. शिवाय, गरमीमुळे चोवीस तास पंखेही सुरू असतात. यामुळे मागणी वाढते. जळगाव परिमंडळ अर्थात जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत मिळून एप्रिल- मेमध्ये विजेची मागणी सुमारे 1300 मेगावॉटपर्यंत पोचत असते. यंदा मात्र खानदेशातून एप्रिल- मेमध्ये आतापर्यंत 985.62 मेगावॉट इतकी मागणी झाली आहे. अर्थात, यंदा विजेची मागणी सुमारे चारशे मेगावॉटने कमी झाली आहे. 

कंपन्या बंदचा परिणाम 
"कोरोना व्हायरस'मुळे देशात "लॉकडाउन' सुरू झाला. यात पहिला "जनता कर्फ्यू' 22 मार्चला घेण्यात आला. त्यानंतर 24 मार्चपासून देशात सर्वत्र "लॉकडाउन' सुरू झाला; तो आतापर्यंत सुरूच आहे. काही भागांत "लॉकडाउन'मध्ये किचिंत शिथिलता देण्यात आली असली, तरी खानदेशात मात्र "लॉकडाउन' सुरू असल्याने कंपन्या बंद आहेत. मुळात "लॉकडाउन'च्या दीड महिन्यात सर्व औद्योगिक क्षेत्र बंद असल्याने त्यांना लागणारी विजेची पूर्णपणे बचत झाली. यामुळे "लॉकडाउन'पूर्वी म्हणजे 20 मार्चला खानदेशात 1181.35 मेगावॉट इतकी मागणी होती. ती आज म्हणजे चार मेस 987.62 मेगावॉट आहे. म्हणजेच उन्हाळा असूनही दीड महिन्यात दोनशे मेगावॉटने विजेची मागणी कमी झाली आहे. 

खानदेशातील विजेचा मागणी 

20 मार्च 

जिल्हा.........मागणी (मेगावॉटमध्ये) 
जळगाव......825.21 
धुळे..........102.15 
नंदुरबार......253.99 

4 मे 
जिल्हा.........मागणी (मेगावॉटमध्ये) 
जळगाव......696.32 
धुळे..........76.96 
नंदुरबार......214.34 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com