तालुका क्रीडा संकुलांच्या कामांना निधीअभावी "ब्रेक' 

राजेश सोनवणे
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

तालुका क्रीडा संकुलांचे काम अपूर्ण असल्याने ते ताब्यात घेतलेले नाही. निधीची कमतरता असल्याने काम बाकी असून, त्याच्या निधीसाठी दोन महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 
- मिलिंद दीक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव
 

जळगाव ः ग्रामीण भागातील मुलांची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उंचवावी, यासाठी तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु तालुका क्रीडा संकुल उभारणीचा प्रकल्प रखडल्याचे चित्र निर्माण झाले असून, संकुल उभारणीसाठी निधी नसल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुका संकुलांचे काम थांबलेले आहे. 

"खेलो इंडिया'अंतर्गत विविध उपक्रम राबवून खेळाडूंना चालना देण्याचे काम करण्यात आले आहे. तत्पूर्वी ग्रामीण भागातून देखील चांगले खेळाडू निर्माण होण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारणीस मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार एका तालुका क्रीडा संकुलासाठी सुरवातीला एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. संकुल उभारणीचे काम "पीडब्ल्यूडी'ला देण्यात आले आहे. याकरिता जिल्हा क्रीडा संकुलाकडे आलेला निधी प्रत्येक तालुक्‍यासाठी 95 लाख रुपये इतके वर्ग करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीला संकुल उभारणीचे काम थांबलेले आहे. 

नक्की वाचा :धक्कादायक...! पती समोरच झाला पत्नीवर अतिप्रसंग 
 

एकही ताब्यात नाही 
जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यासाठी एक संकुल उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. साधारण दहा- पंधरा वर्षांपासून काम सुरू करण्यात आले. यात एका संकुलासाठी 95 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. तरी देखील अद्याप एका देखील संकुलाचे काम पूर्णत्वास गेले नसल्याने संकुल ताब्यात घेतलेले नाही. परिणामी, ग्रामीण भागातील खेळाडूंसाठीची सुविधा पूर्ण झालेली नाही. यात केवळ चाळीसगावचे संकुल ताब्यात घेतलेले आहे. 

आर्वजून पहा : काढली छेड...अन्‌ मग काय झाला रुद्रावतार
 

"पीडब्ल्यूडी'चे देखील थुंक लावून काम 
संकुल उभारणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) देण्यात आले आहे. शासनाकडून निधी मिळत असताना देखील काम चांगल्या दर्जाचे होऊ शकलेले नाही. भुसावळच्या क्रीडा संकुलात तयार करण्यात आलेला रनिंग ट्रॅकचे काम फारसे चांगले नाही. तीच परिस्थिती अमळनेरच्या क्रीडा संकुलाची आहे. तर पारोळा येथील क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये तयार करण्यात आलेले बॅडमिंटनचे कोर्टच्या पाट्या खाली- वर बसविण्यात आल्या असल्याचे चित्र आहे. यामुळे पीडब्ल्यूडीने थुंक लावून काम केल्याचे बोलले जात आहे. 

क्‍लिक कराः जय शिवाजीच्या जयघोषाने दुमदुले जळगाव शहर...
 

निधीची आवश्‍यकता 
मुळात एका संकुलासाठी शासनाकडून एक कोटीचा निधी मंजूर आहे. यातील प्रत्येकी 95 लाख देण्यात आले असून, क्रीडा संकुल पूर्ण करण्यासाठी आणखी निधीची आवश्‍यकता आहे. निधीअभावी संकुलाचे काम होऊ शकत नसल्याने जिल्हा क्रीडा संकुलातर्फे सर्व संकुलांसाठी आठ ते नऊ कोटी रुपयांचा निधी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district "Break" to fund sports complex work