काढली छेड...अन्‌ मग काय झाला रुद्रावतार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

मुलीची छेड काढणाऱ्यावर दोन्ही बहिणींसह बसमधील प्रवासी तुटून पडल्याने एकच गोंधळ उडाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत एमआयडीसीच्या पोलिसांनीही तत्काळ धाव घेत बस पोलिस ठाण्यात रवाना करून बसजवळील गर्दी पांगवून वाहतूक सुरळीत केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

जळगाव: म्हसावद (ता. जळगाव) येथील उच्चशिक्षण घेणाऱ्या दोन्ही बहिणी जळगावमध्ये नूतन मराठा महाविद्यालयात आज आल्या होत्या. परत बसने घरी जाताना गावातील तरुणाने त्यातील लहान बहिणीची छेड काढली. मात्र, संतप्त झालेल्या दोघा बहिणींनी त्याला लगेच प्रत्युत्तर देत त्या तरुणाला येथेच्छ बदडून बस थेट पोलिस ठाण्यात आणल्याची घटना आज घडली. 

जळगाव तालुक्‍यातील म्हसावद येथील सराफा व्यावसायिकाच्या दोन्ही मुली जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे, दोन्ही बहिणी सोबत जळगावात महाविद्यालयात आल्या होत्या. सकाळी साडेनऊला जळगाव - एरंडोल (म्हसावद मार्गे) बसने (एमएच 20, बीएल 2651) घरी म्हसावद येथे परतत असताना लहान बहीण कंडक्‍टर सीटवर तर, मोठी बहीण मागील सीटवर बसली. बस ईच्छादेवी मार्गे निघाली असताना त्यांच्याच गावातील शब्बीर शहा भुरू शहा (फकिरवाडा, रा. म्हसावद) हा देखील त्याच बसमध्ये असल्याने तो सुरवातीला लहान बहिणीच्या सीटसमोर बसून तिला इशारे करत होता. 

क्‍लिक कराः सरकारी कर्मचाऱ्यांना उरले 205 दिवस काम 
 

परिणामी, तिने उठून मागच्या सीटवर आल्यानंतर मोठ्या बहिणीला घडला प्रकार सांगितल्यावर तिने शब्बीर शहा याला जाब विचारल्यावर त्याने धमकी देत अरेरावी केल्या. वाद वाढून दोन्ही बहिणींनी या भामट्याला यथेच्छ झोडपून काढले. घडल्या प्रकाराची दखल घेत बसचालक बशिरुद्दीन जैनुद्दिन शेख (रा. एरंडोल), महिला वाहक खटाबाई साहेबराव बाविस्कर यांना सहप्रवासी उमेश पाटील, अनिकेत चौधरी यांनी बस थांबविण्याची विनंती केली. तांबापुराजवळच बस थांबून संशयिताला पुन्हा बदडण्यात आले. घटनेची माहिती कळताच सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, नितीन पाटील, लुकमान तडवी घटनास्थळावर दाखल होऊन त्यांनी संशयित शब्बीर शहा याला ताब्यात घेत सर्व प्रवाशांसह बस एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणण्यात आली. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश कोळी तपास करीत आहेत. 

क्‍लिक कराः  तो नरभक्षक पून्हा आला...अन्‌ पसरली दहशत 
 

पोलिस तत्काळ घटनास्थळी 
शहरातील संवेदनशील परिसर असलेल्या तांबापुराजवळच मुलीची छेड काढणाऱ्यावर दोन्ही बहिणींसह बसमधील प्रवासी तुटून पडल्याने एकच गोंधळ उडाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत एमआयडीसीच्या पोलिसांनीही तत्काळ धाव घेत बस पोलिस ठाण्यात रवाना करून बसजवळील गर्दी पांगवून वाहतूक सुरळीत केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. रोडरोमियाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

आर्वजून पहा : पैसे दे वरना... बेटी को उठाके धंदे पे बेठाऊंगी !
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon two sister Trickling by Rhodromia