कामासाठी खासदारांनी जळगावात ठाण मांडावे 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 मार्च 2020

कामाचा पाठपुरावा सातत्याने, अविरतपणे हाच भाग शिल्लक राहतो, आणि स्वाभाविकत: त्याची जबाबदारी केंद्र सरकारचे जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून खासदार उन्मेष पाटलांकडे जाते. 

जळगाव  : कोणत्याही विकासकामाची घोषणा, निधीची तरतूद, निविदा प्रक्रिया होऊन मक्तेदाराला कायादेश दिल्यानंतर लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा संपतो, असे साधारणपणे मानले जाते. ते काम वेळेत व चांगल्या पद्धतीने पूर्ण होतेय की नाही, हे पाहणेही संबंधित खात्याची जबाबदारी. मात्र, तसे ते होत नसेल आणि रखडलेले काम लोकांच्या जिवावर उठले असेल तर लोकप्रतिनिधींनी त्यात भूमिका घेणे गरजेचे ठरते. दुर्दैवाने फागणे- तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाची जबाबदारी ना खासदार घ्यायला तयार, ना पालकमंत्र्यांचे त्याकडे लक्ष.. अशी स्थिती आहे.
 
कोणतेही विकासकाम करायचे असेल तर ते मंजूर करण्यापासून त्यासाठी निधीची तरतूद व निविदा प्रक्रिया होईपर्यंत लोकप्रतिनिधींनी त्याचा पिच्छा पुरवला पाहिजे. जळगाव जिल्ह्यात महामार्ग विकासाच्या बाबतीत दोन तऱ्हा दिसून येतात. फागणे- तरसोद टप्प्यातील चौपदरीकरण दोन वर्षांपासून थंड बस्त्यात अथवा कासवगतीने सुरू आहे. तर यासोबतच सुरू झालेले तरसोद- चिखली टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे आहे. दोन्ही कामांमध्ये खासदारांचा पाठपुरावा हा मूलभूत फरक दिसून येतो. 

क्‍लिक कराः  world kidney day : उच्चरक्‍तदाब, मधुमेहींना जडतोय किडनीचा विकार
 

आर्थिक अडचण दूर, पण..
फागणे- तरसोद या 87 किलोमीटर टप्प्यातील कामाला दोन वर्षांपूर्वी सुरवात झाली. काम सुरू करण्यापूर्वीची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतरही हे काम इतके का रखडावे? हाच प्रश्‍न आहे. 30 महिन्यांत पूर्ण करावयाच्या या कामास दोन वर्षे झाल्यानंतरही ते केवळ 20 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण, समस्या त्यात नाही. तरीही हे काम कासवगतीने सुरू आहे. मक्तेदार एजन्सीच्या आर्थिक अडचणीबाबत कारण सांगितले जात होते, मात्र तेदेखील आता नसल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाचे (न्हाई) अधिकारी सी. एम. सिन्हा करतात. त्यामुळे या कामाचा पाठपुरावा सातत्याने, अविरतपणे हाच भाग शिल्लक राहतो, आणि स्वाभाविकत: त्याची जबाबदारी केंद्र सरकारचे जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून खासदार उन्मेष पाटलांकडे जाते. 

आर्वजून पहा :"मनपा'च्या नियोजनशून्यतेमुळे 75 कोटी कचऱ्यात! 
 

बैठकांमधून शून्य फलित 
दोन महिन्यांपूर्वी या रखडलेल्या कामांबाबत "दिशा' समितीची बैठक झाली. खासदार पाटील यांनी त्यात आक्रमक भूमिका घेतली. केवळ फागणे- तरसोद चौपदरीकरणावरच नव्हे तर जळगाव- चाळीसगाव, औरंगाबाद- जळगाव मार्गाच्या कामांवरही चर्चा झाली. उन्मेष पाटलांनी त्या बैठकीतच ही कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचना केल्या. मात्र, दोन महिन्यांनंतरही या बैठकीचे फलित शून्यच असल्याचे दिसून येते. 

खासदारांचा अविरत पाठपुरावा हवा 
गेल्या टर्ममध्ये तत्कालीन खासदार ए. टी. पाटील यांनी फागणे- तरसोद टप्प्यातील कामाचा पाठपुरावा सातत्याने केल्याचे ते सांगत होते. मात्र, त्यांच्या कार्यकाळातही या कामाने गती घेतली नव्हती. आता उन्मेष पाटलांनाही मे महिन्यात वर्ष पूर्ण होईल. पण, या वर्षभरात कामाने 10 टक्‍क्‍यांचाही टप्पा गाठलेला नाही. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, मक्तेदाराला या कामाबाबत काही देणेघेणे नाही, असे दिसते. त्यामुळे मतदारसंघातील महत्त्वाचे काम म्हणून उन्मेष पाटलांनी त्याचा अविरत पाठपुरावा करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचे अधिवेशनाचे दिवस वगळता त्यांनी जळगावात ठाण मांडून बसले पाहिजे. अगदी "न्हाई'च्या स्थानिक कार्यालयात त्यांनी दररोज या कामाबाबत विचारणा केली पाहिजे. पण, तसे होताना दिसत नाही. 

नक्की वाचा : महापालिकेत भाजपमध्ये सुंदोपसुंदी; पदाधिकारी नियुक्तीवरून अंतर्गत धुसफूस
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon fagne-tarsod higway MPs should set up a place in Jalgaon for work