इथे जगण्याची लढाई "त्यांची' अन आमची...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

जळगाव : लग्न सोहळा म्हटला की घोडा हा हवाच...यंदा मात्र लग्न सोहळ्यांवरच निर्बंध आल्याने घोडे आणि बग्गीचा हा व्यवसाय संकटात सापडला आहे. "लॉकडाउन'मुळे या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला असून, मुक्‍या प्राण्यांचीही उपासमार होत आहे. "कोरोना'ने लग्नसराईचा हंगामच गिळंकृत केल्याने घोडे मालकांसह या व्यवसायावर पोट भरणाऱ्या हजारो हातांना आता नवीन काम शोधावे लागणार आहे. 

जळगाव : लग्न सोहळा म्हटला की घोडा हा हवाच...यंदा मात्र लग्न सोहळ्यांवरच निर्बंध आल्याने घोडे आणि बग्गीचा हा व्यवसाय संकटात सापडला आहे. "लॉकडाउन'मुळे या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला असून, मुक्‍या प्राण्यांचीही उपासमार होत आहे. "कोरोना'ने लग्नसराईचा हंगामच गिळंकृत केल्याने घोडे मालकांसह या व्यवसायावर पोट भरणाऱ्या हजारो हातांना आता नवीन काम शोधावे लागणार आहे. 

आर्वजून पहा : धक्कादायक: जिल्ह्यात आणखी 19"कोरोना' बाधित! 
 

जळगाव शहरात सुमारे 30 घोडे व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे असलेल्या घोड्यांची संख्या शंभरावर आहे. यातील बहुतांश जण घोड्यांचा परंपरागत व्यवसाय करीत आहेत. परंतु "लॉकडाउन'मुळे विवाह सोहळे रद्द झाल्याने त्यांचे घोडे दारापुढे उभे आहेत. 

आता तुम्हीच सांगा कसं जगायचं? 
रुख्मिणीनगरातील गंगा घोडेवाले म्हणून प्रसिद्ध असलेले सुरेश इंगळे सांगतात, माझ्याकडे सहा घोडे आणि दोन बग्ग्या आहेत. लग्न समारंभात घोड्यांशिवाय शोभा नाही म्हणून घोड्यांना दरवर्षी मोठी मागणी असते. कर्ज काढून एक एक घोडा खरेदी करीत चार वर्षात व्यवसाय रुळावर आणला. परंतु "कोरोना'च्या संकटामुळे आता या परंपरागत व्यवसायावरच गंडांतर आले आहे. घोड्यांना काय खाऊ घालावे, हा एकच प्रश्नच डोळ्यासमोर आहे. घोड्यांचे खाद्य कमालीचे महागले आहे. ज्वारीचा कडबा, कुट्टी, मठाची चुणी, हरभऱ्याचे दान मिळेनासे झाले आहे. यासह औषधी, डॉक्‍टर असा एका घोड्याचा रोजचा खर्च दोनशे ते अडीचशे रुपये आहे. देखभालीसाठी असलेली दोन माणसे देखील बेरोजगार झाली आहेत. घोड्यांचा सांभाळ कसा करायचा आणि कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा याचीच चिंता आता सतावू लागली आहे. 

नक्की वाचा : डॉक्‍टरसह दोघे कोरोना पॉझिटिव्ह...बाधित एक रूग्णही गरोदर पत्नी, मुलासह पळाला 
 

कमाईचे साधनच गेले.. 
लग्नसराईचा हंगाम तसा तीन ते चार महिन्यांचाच. याच काळात घोडे व्यावसायायिकांची वर्षभराची कमाई होते. त्यानंतर वर्षभर या घोड्यांचे पालनपोषण करावे लागते. यंदा हा हंगाम पूर्णपणे ठप्प झाला आहे. "लॉकडाउन' उठला तरी लग्नसोहळ्यांना परवानगी मिळेल की नाही, हा प्रश्‍नच आहे. तोपर्यंत हंगामच संपलेला असेल. त्यामुळे सरकारने या घोड्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करावी. आता कमाईचे साधन उरलेले नसल्याने शासनाने काही आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी घोडेमालकांकडून केली जात आहे. 

"लॉकडाउन'मध्ये गमावला घोडा 
पिंप्राळ्यातील मंगल घोडेवाले म्हणून ओळख असलेले नासिर हुसैन म्हणाले, आमच्याकडे दोन घोडे होते. लग्नाचा सीझन सुरू होणार म्हणून तिसऱ्या घोड्यासाठी बेणे देखील दिले होते. परंतु आता कोरोनामुळे व्यवसायाचे पार कंबरडेच मोडले आहे. लग्न सोहळे बंद झाल्याने बुक झालेल्या ऑर्डरी रद्द झाल्या आहेत. दिलेला ऍडव्हान्स परत घेण्यासाठी लोक तगादा लावत आहेत. त्यातच "लॉकडाउन'मध्ये उपचार न मिळाल्याने एका घोड्याचा मृत्यू झाला. आता एक घोडा आहे, त्याला काय खाऊ घालायचे, कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा याचीच चिंता सतावत आहे. 

क्‍लिक कराः सगळ्यांचे चांगले होईल, माझा आर्शिवाद आहे  कोरोनामुक्त महिलेच्या भावना 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Financial crisis facing horse traders