पानटपऱ्या, खाद्यपदार्थ विक्री दुकाने आजपासून "बंद' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

जिल्ह्यात "कोरोना'च्या संशयितांची संख्या लक्षात घेता खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हास्तरावर रोज महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत लग्नसोहळे, समारंभ, हॉल, सभागृह, मेळावे, आठवडे बाजार 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज नव्याने काही महत्त्वाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

जळगाव : "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली असून, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडून दैनंदिन आढावा घेतला जात आहे. दरम्यान, आज रात्री दहापासून जिल्ह्यातील देशी दारूसह सर्व परमिट रूम, पानटपऱ्या आणि उघड्यावरील सर्व खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने उद्यापासून (21 मार्च) 31 मार्चपर्यंत बंद ठेवावेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्दची कारवाई करण्यात येणार आहे. वाईन शॉप मात्र या आदेशातून वगळण्यात आले आहेत. राज्य उत्पादनशुल्क विभागाने हे आदेश जारी केले आहेत. 
 

हेपण पहा - महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने घेतला निर्णय...सलून दुकाने 23 मार्चपर्यंत बंद 

उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी 
जिल्ह्यात "कोरोना'चा फैलाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. यात जिल्ह्यातील सर्व खाऊंची पाने, पानटपरी, तंबाखूजन्य पदार्थ, मावा, सुगंधी सुपारी व तत्सम खाण्याचे व चघळण्याचे पदार्थ विक्री करणारी सर्व दुकाने आणि रस्त्यावर/उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करण्यावर उद्यापासून (21 मार्च) 31 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंडसंहिता 1860 (45)चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहणार आहे. 

मौजे कर्की, मौजे चोरवडला चेकपोस्ट 
जिल्ह्यात अनेक मोठ्या शहरांतून प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे "कोरोना'चा संसर्ग वाढण्याची शक्‍यता असते. या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्‍यातील मौजे कर्की व रावेर तालुक्‍यातील मौजे चोरवड येथे चेकपोस्ट तयार करून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पथक कार्यान्वीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पोलिस अधीक्षकांनीही आवश्‍यक पोलिस कर्मचारी व पथकात वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

बाजार समितीतही प्रवेशावर मर्यादा 
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे धान्य खरेदी वा विक्रीसाठी होणारी गर्दी टाळण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीत एखाद्या व्यवहारासाठी एकाच वेळी दहापेक्षा अधिक लोकांना प्रवेश देऊ नये, अशा सूचना आहेत. तसेच बाजार समितीतील व्यवहार हे टप्प्या-टप्प्याने करण्यात यावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीची राहणार असून, आदेशाचा भंग झाल्यास कारवाई केली जाणार आहे. 

क्‍लिक करा -कोरोनाचा पहिला गुन्हा दाखल

बॅंकांमध्ये एकावेळी चार ग्राहकांनाच प्रवेश 
मार्चअखेरची धावपळ लक्षात घेता बॅंकांमध्ये मोठी गर्दी होते. या ठिकाणचीही गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बॅंकांमध्ये एकावेळी चार ग्राहकांनाच प्रवेश देण्याचे आदेश आहेत. तसेच रोख भरणा व काढणे ही दोनच कामे प्राधान्याने बॅंकेने करावीत, पासबुक भरण्यासाठी रांगेत उभ्या राहणाऱ्या ग्राहकांमध्ये पाच फूट अंतर राहील, अशी व्यवस्था करावी. ग्राहकांनीही बॅंकेच्या काऊंटरपासून तीन ते पाच फुटांचे अंतर ठेवावे. सर्व ग्राहकांनी इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग, यूपीआय, एटीएम, सीडीएम मशिन आदी सुविधांचा अधिकाधिक वापर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

जिल्हास्तरीय समिती स्थापन 
"कोरोना'चा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती रोज सकाळी अकराला जिल्हाधिकारी दालनात दैनंदिन आढावा घेणार आहे. यात समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहणार असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अथवा त्यांचे प्रतिनिधी हे सदस्य सचिव राहणार आहेत. याशिवाय जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अथवा या सर्वांचे प्रतिनिधी हे समिती सदस्य राहणार आहेत. दैनंदिन बैठकीस समितीतील सदस्य व सचिवांनी अद्ययावत माहितीसह न चुकता बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Food stoll tea stoll closed today