सीमावर्ती भागातून होतेय गांजाची तस्करी 

सीमावर्ती भागातून होतेय गांजाची तस्करी 

जळगाव : महाराष्ट्रात नक्षल प्रभावित डोंगराळ आणि दुर्गम भागात चंद्रपूर, गडचिरोली, मेळघाटात आतापर्यंत गांजाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती. मात्र, पारंपरिक शेतीतून येणारा कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, रोखीचे उत्पन्न देणाऱ्या पिकांचे नुकसान यामुळे महाराष्ट्राच्या सीमावर्ती डोंगराळ प्रदेशात आदिवासीबहुल भागातही आता गांजाची शेती होऊ लागली आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती दुर्गम डोंगराळ भागात गांजाचे पीक घेतले जाते. मध्य प्रदेशातील इंदूर आणि महाराष्ट्रात जळगाव हे तस्करांचे मोठे "ठाणे' समजले जाते, त्यातून कोट्यवधी रुपयांच्या मालाची आवक-जावक ठरलेली असते. 

जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगाचे वरदान जिल्ह्याला मिळाले आहे. मुक्ताईनगरनंतर थेट नंदुरबार जिल्ह्यापर्यंत सतापुडा पर्वतांचा परिसर व्यापलेला आहे. एकीकडे महाराष्ट्रासमोर मध्यप्रदेश आणि नंदुरबार येथून काही अंतरावरच गुजरात अशा तीन महत्त्वाच्या राज्यांची सीमा या पर्वतरांगेला लागून आहे. परिणामी, अवैध धंद्यांचे आश्रयस्थान म्हणून या परिसराला बघितले जाते. 

शस्त्रांसह गांजाची तस्करी 
मध्यप्रदेशात अवैध शस्त्र निर्मिती होऊन ती महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातूनच तस्करी होते. त्याचप्रमाणे गांजाच्या तस्करीचा उद्योगही मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. स्थानिक नागरिकांना हाताशी धरून मालवाहू वाहनांद्वारे, चाऱ्यांमध्ये, केळीच्या घडांखाली, भाजीपाल्यातून हा गांजा एका ठिकाणाहून दुसरीकडे ने-आण केली जाते. 

लक्‍झरियस वाहनांचा वापर 
दुर्गम जंगलात गांजाचा माल साठवून ठेवला जातो. गांजा तस्कर हल्ली डस्टर, फोर्च्युनरसारखी आलिशान वाहने किंवा पॉश कार घेऊन तेथे पोहोचतात. महामार्गावर त्यांना थांबवले जाते. त्यांच्याकडून गांजाची किंमत मोजून घेतल्यानंतर तस्कराची माणसे गांजाची खेप घ्यायला आलेल्यांकडून त्यांचे वाहन ताब्यात घेतात. हे वाहन घनदाट जंगलात नेले जाते. तेथे संशय येऊ नये म्हणून कपड्यांचे, पुस्तकांचे, प्रिंटिंग मटेरियल किंवा किमती वस्तूंचे गठ्ठे वाटावे, अशा पद्धतीने आतमध्ये गांजा दडवून गठ्ठे बांधले जातात. त्यानंतर वाहन जंगलातून बाहेर आणून खेप घ्यायला आलेल्यांच्या हवाली केले जाते. 

दुप्पट- अडीचपट नफा 
सध्या बाजारपेठेत गांजाचा (सरकारी) भाव 15 हजार रुपये प्रति किलो लावला जातो. मुख्य तस्करांकडून छोट्या तस्करांना तो 8 हजार रुपये किलोने मिळतो. दुसरे म्हणजे. ओला असल्याने 25 किलोच्या गठ्ठ्यात दोन ते तीन किलो गांजा जास्तीचा असतो. गांजा तस्कर त्याच्या छोट्या छोट्या (50 व 100 ग्राम) प्लॅस्टिक पाऊचमध्ये पुड्या बनवून त्या 50 रुपयांपासून 150 ते 200 रुपयांना विकतात. त्यामुळे विकणारांकडे 8 हजारांच्या गांजाचे 20 ते 25 हजार रुपये सहज गोळा होतात. 

जळगावात येथे होते गांजाची विक्री 
जळगाव रेल्वेस्थानक परिसरात दोन्ही बाजूने गांजा विक्रेते असतात. मुख्य बाजूकडून रिक्षाथांबा, चहा-पान टपऱ्यांवर, गेंदालाल मिलकडील बाजूने रेल्वे जिन्याखाली, शिवाजीनगर, शाहूनगर, तांबापुरा खदानीचा परिसर, सुप्रिम कॉलनी, एमआयडीसीत-एन व जी सेक्‍टर, पिंप्राळा हुडको, गिरणानदी काठी बांभोरी, निमखेडी शेतकी शाळेजवळ, सुरत लाइन मालधक्का, दूध फेडरेशनजवळ, शाहूनगर जळकी मिल-ट्रॅफिक गार्डन, शनिपेठचा काही भाग, कांचनगर, जैनाबाद, जुनी खेडी, महामार्गावर "गोदावरी'जवळील स्टॉप, हरीविठ्ठल, समतानगर आदी परिसरात पान-टपऱ्यांवर, दुचाकीने विक्रीसाठी पुड्या घेऊन येणाऱ्यांचे दिवस ठरलेले असतात. ग्राहकांना "मिस्ड्‌ कॉल'वर निश्‍चित ठिकाणी पोहोचल्यावर माल मिळतो. 

गुन्हे बैठकांचा केवळ फार्स 
सीमावर्ती भागातील शस्त्रांसह गांजाची तस्करी, अवैध धंदे आणि वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलिसदलाची संयुक्त बैठक (इंटरस्टेट क्राइम मीटिंग) नियमितपणे दर सहा महिन्यांनी होते. परंतु, या बैठकीची केवळ औपचारिकता तेवढी पूर्ण केली जाते. बैठकीतील मुद्यांवर झालेल्या चर्चेनुसार काही दिवस काळजी घेतली जाते, पुन्हा "जैसे थे' स्थिती निर्माण होते. त्यामुळे या गुन्हेगारीवर दोन्ही प्रदेशांच्या पोलिस यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत. 

गंजोटलींची ठिकाणे 
शिवाजी उद्यान जे. के. पार्कजवळील परिसर, दफनभूमीत, गणेशकॉलनी दर्गा परिसर, निमखेडी तपोवन, एमआयडीसीत ट्रायडन्ट स्टील समोर, सुप्रिम कंपनीच्या रांगेतील ढाबे वजा हॉटेल्स शेजारी, गिरणानदी पात्राला लागून असलेल्या स्मशानभूमीच्या परिसरात हे आढळून येतात. 

(दोन वर्षातील कारवाईची आकडेवारी ) 

वर्ष 2018 
दाखल गुन्हे : 05 
जप्त माल : 148 किलो 
अटक आरोपी : 08 
किंमत : 13 लाख, 37 हजार 723 

वर्ष 2019 (जुलैअखेर) 
दाखल गुन्हे : 08 
जप्त माल : 1 हजार 114 किलो 553 ग्रॅम 
अटक आरोपी : 11 
किंमत : 83 लाख, 46 हजार 660 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com