बलोपासनेसाठी झाली राज्यात मारोती मंदिरांची निर्मिती 

बलोपासनेसाठी झाली राज्यात मारोती मंदिरांची निर्मिती 

हनुमानाला रामाचा निस्सीम भक्त मानले गेलेय.. तरीही श्रीरामापेक्षा महाराष्ट्रात हनुमानाची मंदिरं अधिक आहेत. समर्थ रामदासांनी राज्यभरात बलोपासनेसाठी काही मंदिरांची निर्मिती केल्याचे दाखले आहेत. ही सर्व 11 मंदिरे जागृत देवस्थानं म्हणून प्रसिद्ध असून भक्ती, श्रद्धेसोबत शक्तीचीही ती प्रतीकं आहेत. नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी किल्ल्यावरील ठिकाण हनुमानाचं जन्मस्थळ समजलं जातं. तर मराठवाड्यातील भद्रा मारोती, नागपूरजवळील जामसावळीचा विश्रांती घेणारा हनुमान, अमरावती जिल्ह्यातील जहागीरपूरचा महारुद हनुमान अशी वैशिष्ट्यपूर्ण मारोती मंदिरांची मालिका राज्याला लाभलेली आहे. 

अंजनीसूताचं जन्मस्थळ अंजनेरी किल्ला 

अंजनेरी (नाशिक) ः अंजनेरी किल्ल्यावर अंजनी पुत्र हनुमानाचे जन्मस्थळ असल्याची आख्यायिका आहे. हा किल्ला ऋषीमुख पर्वत म्हणून प्रसिद्ध आहे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले असे भाविक मानतात. अंजनेरी गावात दरवर्षी श्रीराम नवमीला सप्ताहाची सुरवात होऊन हनुमान जयंतीला त्याची सांगता होते. यंदा लॉकडाऊनमुळे हा सप्ताह स्थगित करण्यात आला आहे. नाशिकपासून 20 किलोमीटर अंतरावर अंजनेरी फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांवरुन गडावर जाता येते. मुळेगावच्या वाटेनेही गडावर जाता येते. 



विश्रांती घेणारा जामसावळीचा हनुमान 

नागपूर : मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या सावली गावात विश्रांती घेणारा हनुमान म्हणजे जामसावळीचा मारुती. छिंदवाडा जिल्ह्यात जाम व सर्पानदीचा संगमावर हे तीर्थक्षेत्र असून, पिंपळाच्या छायेत निद्रावस्थेत ही हनुमंताची स्वयंभू मूर्ती आहे. मूर्तीच्या खाली गुप्तधन असल्याच्या संशयावरून हनुमानाची मूर्ती सरकविण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे मूर्ती निद्रावस्थेत गेली अशी येथील ग्रामस्थांची धारणा आहे. तर संजीवनी बुटीच्या शोधार्थ निघालेल्या हनुमंताने येथेच विश्रांती घेतली होती, शिवाय महाभारतातील संदर्भानुसार हनुमानाने येथेच भीमाचे गर्वहरण केले होते, असेही सांगितले जाते. नागपूर येथून या मंदिरावर जाता येते. 

बलोपासनेसाठी निर्मिली रामदासांनी 11 मारुती मंदिरे 

सातारा ः युवकांत बलोपासनेची आवड निर्माण व्हावी यासाठी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली 11 मारुती मंदिरे ही युवकांना बलोपासनेकडे वळवत आहेत. त्यात चाफळला (ता. पाटण, जि. सातारा) दास मारुती व प्रताप मारुती अशी दोन मंदिरे आहेत. मसूर (ता. कऱ्हाड, जि. सातारा), शिंगणवाडी (ता. पाटण, जि. सातारा), शहापूर (ता. कऱ्हाड, जि. सातारा), उंब्रज (ता. कऱ्हाड, जि. सातारा), माजगाव (ता. पाटण, जि. सातारा), बहेबोरगाव (ता. वाळवा, जि. सांगली), मनपाडळे (ता. वारणा, जि. कोल्हापूर), पारगाव (ता. वारणा, जि. कोल्हापूर), बत्तीस शिराळे (ता. वारणा, जि. सांगली) येथेही मारुती मंदिरे आहेत. दरवर्षी श्रावणातील शनिवारी हजारो युवक या 11 मारुती मंदिरांची परिक्रमा करतात. कऱ्हाड तालुक्‍यातील एक युवकांचा संघ तर अत्यंत शिस्तबद्धपणे बुलेटवरून श्रावणातील शनिवारी परिक्रमा करतात. या युवकांची शिस्त, त्यांनी केलेला जयजयकार आणि बुलेटच्या आवाजाचा धडधडाट ऐकणे ही एक पर्वणी असते. 


जहागीरपूरचा महारुद्र मारोती 

तळेगावठाकूर ः तिवसा तालुक्‍यातील (जि. अमरावती) जहागीरपूर येथील श्रीक्षेत्र महारुद्र मारोती देवस्थानाला 400 वर्षांचा इतिहास आहे. खुद्द ड्रिमगर्ल हेमामालिनी यांचीही येथील महारुद्र मारोतीवर श्रद्धा असल्याने त्यांनी तब्बल दोनवेळा मंदिरात येऊन दर्शन घेतले. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंतीला संस्थानतर्फे विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. जहागीरपूरच्या हनुमान मंदिरात प्रवेश करता प्रसन्न मूर्तीचे दर्शन होते. ही मूर्ती साडेचार फूट उंच आहे. मूर्तीसमोर 81 तोडीचे चांदीचे सहा इंच सुंदरसे नेत्र आहे. 13 किलो चांदीचा मुकुट असून दर शनिवारी उत्सवप्रसंगी मूर्तीवर ठेवल्या जातो. राष्ट्रीय महामार्गावर तिवसा शहरापासून जहागीरपूर 25 किलोमीटर अंतरावर आहे. अमरावतीवरून या गावाचे अंतर 37 किलोमीटर तर, धामणगावरेल्वे येथून 23 किलोमीटर अंतरावर आहे. 

गौडगाव येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर 

सोलापूर ः हनुमानाला शक्तिदेवतेचे स्थान असल्याने बलप्रतिष्ठा कमवण्यासाठी समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात 11 ठिकाणी हनुमानाची मंदिरे स्थापन केली आणि याच धर्तीवर गौडगांव बु.(ता. अक्कलकोट) येथील मंदिर (मारुती) निर्माण झाले असावे, असा लोकमानस आहे. मूळ मंदिरात प्रवेश करणपूर्वी सोनमारुतीचे दर्शन घेणे क्रमप्राप्त आहे. आकर्षक प्रवेशद्वारावरील नक्षीकाम क्षणभर थांबायला लावते. येथे बांधण्यात आलेले अन्नछत्र मंडळ व भक्तनिवास भक्तांच्या स्वागताला सज्ज आहे. येथील हनुमानावर भक्तांची श्रद्धा, लोक मान्यता व मंदिर समितीची कार्यपद्धती ह्या गोष्टी उत्साहवर्धक आहेत, असे संस्थेचे पदाधिकारी श्रीकांत खानापुरे यांनी सांगितले. 

कौल देणारा शिरसाळ्याचा मारोती 

जळगाव : जिल्ह्यात बोदवड तालुक्‍यातील शिरसाळे येथे मारोतीचे जागृत देवस्थान आहे. या अतिप्राचीन मंदिरावर छत बांधण्याचा प्रयत्न झाला, त्या-त्या वेळी छत टिकले नाही, असा अनुभव सांगितला जातो. कौल देणारा मारोती म्हणून हे देवस्थान प्रसिद्ध आहे. मूर्तीवर भक्ताच्या इच्छेनुसार दोन शिला ठेवल्या जातात, इच्छा पूर्ण व्हायची असेल तर एका बाजूची शिला पडते.. या पद्धतीने हा मारोती कौल देतो. तसेच, सलग पाच शनिवार मारोतीचे दर्शन घेतले तर संकट दूर होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. माजीमंत्री एकनाथराव खडसे या हनुमानाचे भक्त आहेत, त्यांच्या प्रयत्नातून या मंदिराचा परिसर सुविधांनी सुसज्ज झाला आहे. जळगावपासून 75 तर जळगाव-नागपूर महामार्गावरील मुक्ताईनगरपासून अवघ्या 12 कि.मी. अंतरावर हे देवस्थान आहे.

आंदोलनांचा साक्षीदार कोल्हापूरचा उभा मारुती 
कोल्हापूर ः या मारुतीला धार्मिक अधिष्ठान तर आहेच. पण हा मारुती म्हणजे कोल्हापुरातील प्रत्येक सामाजिक व राजकीय घडामोडींचा साक्षीदार आहे. कोल्हापुरात ज्या आंदोलनाची, चळवळीची सुरवात होते ती या मारुतीला साक्षी ठेवूनच. मंदिराला लागून जो चौक आहे त्याचे नावही उभा मारुती चौक आहे. शिवाजी पेठ म्हणजे एके काळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. त्यामुळे महागाईच्या विरोधातील 1967 मध्ये जे राज्यव्यापी आंदोलन झाले त्याची सुरवात या मारुतीच्या साक्षीनेच झाली. याशिवाय डाव्यांपासून उजव्यांपर्यंत सर्व प्रमुख नेत्यांची भाषणे या मारुतीसमोरच झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील उग्र आंदोलनाचा हा मारुतीच साक्षीदार ठरला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com