"आयएमए'चे 250 डॉक्‍टर "कोरोना'त सेवा देणार : अध्यक्ष डॉ.दीपक पाटील 

ima.
ima.

जळगाव :  जिल्हा कोरोनामुक्त करण्यास खासगी दवाखाने अधिग्रहीत करण्यापेक्षा आम्ही शासकीय यंत्रणेसोबत शासकीय रुग्णालयात येऊन जिल्ह्यातील 250 डॉक्‍टर सेवा देण्यास तयार असल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील यांनी आज येथील जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या बैठकीत सांगितले. 

येथील जिल्हा नियोजन भवनात जिल्हास्तरीय जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयएमएचे सर्व सदस्य जिल्हा प्रशासनासोबत आहे. आवश्‍यक ती सर्व मदत करण्यास तयार असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले. 

प्रशासनाच्या उपायांना साथ द्या ः पालकमंत्री 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. आरोग्य विभागासह प्रशासनातील घटक करीत असलेल्या उपाययोजनांना समाजातील सर्वांनी साथ देऊन जळगाव जिल्हा लवकरच कोरोनामुक्त करुया असा निर्धार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी झालेल्या बैठकीत केला. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, महापालिकेच्या महापौर सौ. भारती सोनवणे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन. पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्करराव खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, इंडियन मेडिकल असोसिएशचे पदाधिकारी, डॉक्‍टर्स, समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते. 

खासगी डॉक्‍टरांनी रुग्णाची तपासणी करावी 
पालकमंत्री पाटील म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या यंत्रणांना कुठल्याही प्रकारची साधनसामग्री किंवा निधी कमी पडणार नाही. आरोग्य विभागातील सर्व यंत्रणांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सांघिक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. यासाठी सर्व यंत्रणांचा आपआपसात समन्वय महत्त्वाचा आहे. या काळात खासगी डॉक्‍टरांनीही समाजाप्रती आपली सेवाभाव अधिक वृद्धिंगत करत रुग्णांना तपासण्यास किंवा त्याच्यावर इलाज करण्यास नकार देवू नये. 

डॉ.पाटील रुग्णालय कोवीड करा 
नॉनकोविड रुग्णांना होणारा त्रास व जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेतला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय हे कोविड रुग्णालय करावे. नॉन कोविड रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार व्हावेत अशी मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री पाटील यांच्याकडे केली. याबाबत परिस्थिती पाहून आवश्‍यक तो निर्णय घेण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. 

बाधित रुग्णांवर अंत्यसंस्काराचे धोरण ठरवा 
परदेशातून येणाऱ्या नागरिकांबाबत धोरण ठरवावे, चोपडा येथील रुग्णालयास आवश्‍यक साधनसामुगी उपलब्ध करून देणे, नॉन कोविड रुग्णांना गोदावरी हॉस्पिटलला जाण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देणे, ऑर्डनन्स फॅक्‍टरीतील कामगारांना वर्क फ्रॉम होम करण्यास परवानगी मिळावी, मृत कोरोना बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचे धोरण ठरवावे आदी सूचना केल्या. उपाययोजना सुचविल्या. 

स्वॅब तपासणी लॅब सुरू करा 
आमदार सावकारे यांनी सूचना मांडली की, जळगावला कोरोना बाधितांचे स्वॅब तपासणी लॅब लवकरात लवकर सुरू करावी. त्यासाठी आमदार निधी देण्यास तयार आहे. कोरोना नसलेल्यांना स्वॅबचा रिपोर्ट येण्याची प्रतीक्षा करावी लागते. लॅब लवकर झाल्यास तात्काळ रिपोर्ट येईल व पुढील उपचाराची दिशा मिळेल. 

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी जिल्ह्यातील कोरोना विषाणूचे रुग्ण आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली. निधीची कुठलीही अडचण नसून विलगीकरण कक्ष तसेच प्रत्यक्ष पॉझिटिव्ह रुग्णांच्या इलाजही योग्यरीत्या सुरू असल्याचे सांगितले. 

कोरोनाबाबत नागरिकांना काही अडचण येत असल्यास त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या हेल्पलाइन क्रमांक 2242111 वर संपर्क साधावा. बैठकीस उपस्थित जिल्ह्यातील नामवंत डॉक्‍टरांनी आपले विचार मांडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com