देशातील दहापैकी एक "टेक्‍स्टाईल पार्क' जळगावात 

textile
textile

जळगाव : केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने देशभरात दहा ठिकाणी टेक्‍स्टाईल पार्कच्या स्वरूपात "मेगा क्‍लस्टर' प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. या दहापैकी महाराष्ट्रातील एकमेव पार्क जळगाव जिल्ह्यात साकारणार असून, त्यासाठी राज्य सरकारच्या सहमतीची आवश्‍यकता आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली असून, जळगाव जिल्ह्यात नगरदेवळा येथे एक हजार एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रात पार्क साकारण्याचे प्रस्तावित आहे. त्यातून सुमारे 30 हजारांवर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2016 मध्ये जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यात जामनेरला झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्यात टेक्‍स्टाईल पार्कची घोषणा केली होती. त्यासाठी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्‍यात शंभर एकर जागाही ठरवून दिली. मात्र, त्यानंतरच्या काळात या पार्कच्या उभारणीबाबत कोणतीही प्रक्रिया झाली नाही. आणि आता केंद्र सरकारने देशभरात 10 टेक्‍स्टाईल पार्क उभारण्याचे नवे धोरण आखले आहे. 

कापूस उत्पादक खानदेश 
मुळातच खानदेश हा कापूस, मका उत्पादनासाठी अग्रेसर आहे. जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. एकट्या जळगाव जिल्ह्यात 8 लाखापैकी 70 टक्के म्हणजे 5 लाख 15 हजार हेक्‍टर क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले जाते. जळगावसह जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, अमळनेर, धरणगाव या तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात क्षेत्र कापसाखाली आहे. महाराष्ट्रात कापूस लागवडीखालील क्षेत्राचा आकडा जवळपास 42 लाखांवर आहे. 

..म्हणून जळगावची निवड 
केळीसोबतच कापूस उत्पादनातील मोठा जिल्हा म्हणून या टेक्‍स्टाईल पार्कसाठी जळगाव जिल्ह्याची निवड राज्यभरातून करण्यात आली आहे. कापूस ते कापड अशी संपूर्ण प्रक्रिया या क्‍लस्टर व पार्कच्या क्षेत्रात होईल. सुमारे एक हजार एकर जागेवर हा प्रकल्प साकार होणार आहे. नगरदेवळा येथे त्यासाठी शासनाची जवळपास तीन हजार एकर जागा उपलब्ध असून, त्यातून या पार्कसाठी जमीन उपलब्ध होऊ शकेल. हा पार्क साकारल्यास खानदेशच नव्हे तर विदर्भातील कापूसही याठिकाणी आणला जाऊन त्यावर प्रक्रिया होऊ शकेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com