डॉ. खोडेंना रोखण्यासाठी राजकीय "खेळी'? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे आहेत. अशा स्थितीत महापालिका आयुक्तांना नियुक्त न होऊ देण्याबाबत कोणत्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून ही खेळी करण्यात आली. याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे. 

जळगाव  : महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. माधवी खोडे-चावरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या हजरही होण्यास तयार होत्या. मात्र, राजकीय खेळातून त्यांना रोखण्यात आल्याची चर्चा आहे. दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी तातडीने आयुक्तांना नियुक्त करावे, अशी मागणी विधिमंडळात केली आहे. मग या आयुक्तांना हजर होण्यापासून रोखणारा "नेता' कोण? असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. 

 क्‍लिक कराः  जळगाव मनपा अंदाजपत्रात स्थायी समितीकडून 154 कोटीची वाढ ! 
 

महापालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर महापालिका आयुक्तपद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्तच आहे. नुकत्याच झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यात नागपूर येथील डॉ. माधवी खोडे-चावरे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. "आयएएस' असलेल्या डॉ. खोडे जळगाव येथे रूजू होण्यास तयारही होत्या. मात्र, अचानकपणे त्यांनी निर्णय फिरविला व त्या हजर न झाल्यामुळे आता नवीन आयुक्त नियुक्तीची प्रतीक्षा आहे. मात्र, नियुक्त झालेल्या डॉ. खोडे यांना हजर होण्याबाबत राजकीय वर्तुळातूनच खेळी करण्यात आल्याचे वृत्त आहे. आमदार सुरेश भोळे यांनी आयुक्त नियुक्तीबाबत थेट विधिमंडळातच प्रश्‍न उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी थेट म्हटले आहे, की महापालिकेच्या आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्या हजर झाल्या नाहीत. तसेच नवीन आयुक्तही देण्यात आलेले नाहीत. आयुक्त नसल्यामुळे महापालिकेतील व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. तसेच शहरात "कचरा'कोंडीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या मक्तेदारावरही कारवाई केली जात नाही. शहरातील समस्या सोडविण्यासाठी तातडीने आयुक्त नियुक्त करावेत, अशी मागणी त्यांनी विधिमंडळात केली. त्यामुळे महापालिकेत आयुक्त हजर न होणे व नवीन आयुक्त नियुक्तीवरून राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. 

आर्वजून पहा : चुलत बहिणीने फुलवले भावाच्या जीवनाचे पुष्प 

महापालिकेत "आयएएस' दर्जाचे आयुक्त नियुक्त झाले असते तर त्यांनी थेट शहरात सुरू असलेल्या कामातील मक्तेदारांना दंड केला असता, तसेच हा मक्ताही रद्द झाला असता. कारण त्या शिवाय पुढचे काम सुरूच होण्याची शक्‍यता नव्हती. ही सर्व कारवाई थांबविण्यासाठीच आयुक्त हजर न होऊ देण्याबातचची खेळी करण्यात आली. राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षामार्फत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे आहेत. अशा स्थितीत महापालिका आयुक्तांना नियुक्त न होऊ देण्याबाबत कोणत्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून ही खेळी करण्यात आली. याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे. 

 "बढती'वरील आयुक्तांची चर्चा 
"मक्तेदार' वाचविण्यासाठी महापालिकेवर आयएएस आयुक्त न देता "बढती'वरील आयुक्त देण्यासाठी खेळी सुरू झाली असून, लवकरच त्या अधिकाऱ्याचे नाव जाहीर होण्याचीही शक्‍यता व्यक्त होते. मात्र, भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी विधिमंडळात थेट आयुक्त नियुक्तीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे आता आयुक्त नियुक्तीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

नक्की वाचा : गो...कचरा...गो, गो...वॉटर ग्रेस...गो ! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jmc Dr. khode Political "play to prevent erosion."