भाजपचे... खडसेंबाबत अडतेय कुठे... ?

aknathraw khadse
aknathraw khadse
Updated on

जळगाव  : जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीच्या पूर्वसंध्येला भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने जळगावला येतात. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना पाचारण करून त्यांच्याशी चर्चा करतात, त्यानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होतो. राज्यसभेसाठी एकनाथराव खडसे यांचे नाव आम्ही महाराष्ट्रातून दिले आहे. मात्र, काय झाले माहीत नाही. मात्र, आता आम्ही विधानपरिषदेसाठी त्यांचा विचार करू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगतात. याचा अर्थ एकनाथराव खडसे भाजपला हवे आहेत, मग त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न नेमका अडतोय कुठे? हाच खरा प्रश्‍न भाजपच्या कार्यकर्त्यांनाही पडला आहे. 
राज्यात भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीत एकनाथराव खडसे यांचा मोलाचा वाटा आहे, हे कुणीही नाकारणार नाही. पक्षाची राज्यात सत्ता आणण्यातही गेल्या वेळी त्यांचा वाटा मोठा होता. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींची नाराजी झाली अन त्याचा त्यांना फटका बसला. त्यावेळी त्यांचे मंत्रिपद तर गेलेच; परंतु कालांतराने पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारीही दिली नाही. त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली. मात्र, तिचाही पराभव झाला. त्यानंतरही खडसे यांचे पक्षासाठी कार्य सुरूच आहे. पक्षात खडसे यांचे पुनर्वसन होईल, अशा चर्चा सुरू होत्या. राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. अगदी प्रदेशतर्फे त्यांच्या नावाची शिफारसही करण्यात आली होती, असे स्वत: प्रदेशाध्यक्षांनीच सांगितले आहे. मात्र, त्यानंतरही त्यांना पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आलेली नाही. याबाबत मात्र पक्षातर्फे कोणतीही अधिकृत माहिती देण्यात येत नाही. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात, विधान परिषदेसाठी आम्ही त्यांचा विचार नक्की करू, मात्र आता या वक्तव्याबाबत विश्‍वासाचे प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. 

पक्षनेतृत्वाकडून खुलासा नाहीच 
श्री. खडसे भाजपला सद्य:स्थितीत हवे आहेत. त्यांची आक्रमकता, अभ्यासूपणा हा राज्यात सध्या विरोधी पक्ष असलेल्या भाजपला फायद्याचा ठरणार आहे. शिवाय, विधान परिषदेत ते सरकारला निश्‍चित धारेवर धरू शकतील, याचा सर्वानाच विश्‍वास आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांची त्यांच्या पुनर्वसनाबाबत सकारात्मकता आहे. मग नेमके अडते कुठे? याबाबत पक्षनेतृत्व खुलासा करण्यास तयार नाही. मात्र, खडसेंना आणि त्यांच्या समर्थकांना आता राजकीय पुनर्वसनासाठी आता पुन्हा विधान परिषदेसाठी प्रतीक्षा मात्र आहे. मात्र, अडलेले घोडे बाजूला होईल, तेव्हाच हे शक्‍य होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com