अस्वच्छतेचे ग्रहण.....सफाई मक्‍त्याचा गुंता वाढला... मक्तेदार न्यायालयात !

अस्वच्छतेचे ग्रहण.....सफाई मक्‍त्याचा गुंता वाढला... मक्तेदार न्यायालयात !
Updated on

जळगाव : शहरातील नागरिक गेल्या दहा वर्षांपासून सुविधा मिळत नसल्याने त्रस्त आहेत. रस्ते, पाणी, गटारी, पथदिवे या मूलभूत सुविधांसाठी जळगावकरांचा झगडा सुरूच आहे. त्यातच आता शहरात अस्वच्छतेच्या समस्येने गंभीर रुप धारण केले असून, एकमुस्त (एकच) सफाईचा मक्ता दिल्यावर सुद्धा जळगावकरांवरील समस्यांचे ग्रहण काही सुटत नसल्याचे दिसत आहे. एकीकडे सफाई मक्तेदार न्यायालयात गेला आहे. तर दुसरीकडे शिवसेना पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात असून, प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. 

गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून सफाई मक्तेदाराने काम बंद केल्याने शहरात जागोजागी कचरा साचला आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी साथरोग पसरण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. परंतु महापालिका प्रशासनाकडून सफाई मक्तेदाराचा प्रश्न सुटत नसल्याचे दिसत आहे. त्यात मक्तेदार न्यायालयात गेल्यामुळे हा प्रश्न जास्त चिघळणार असल्याचे दिसत आहे. 

सफाई मक्ता अटी-शर्तीच्या गुंत्यात 
महापालिकेने पाच वर्षांसाठी नाशिकच्या "वॉटरग्रेस' कंपनीसोबत करार केला आहे. या करारात तसेच अटी-शर्तीमध्ये मक्ता गुंतलेला दिसत आहे. त्यात मक्तेदाराला तीन महिने सेटल होण्यासाठी वेळ देणे, त्यामुळे आकारलेला दंड कमी होणे, तो आकारणे, त्याला महापालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या सुविधा लवकर न दिल्या गेल्यामुळे देखील हा सफाईचा मक्ता अधिकच गुंतागुंतीचा होत गेला 

वेतनाअभावी कर्मचाऱ्यांचे आंदोलन 
सफाई मक्तेदाराकडून घंटागाडीवरील चालकापासून ते सफाई कामगारांना वेळेत तसेच नियमानुसार किमान वेतन मिळत नसल्यामुळे देखील समस्या निर्माण होत गेल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दोन-तीन वेळा आंदोलन केले होते. तसेच सफाई मक्तेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे स्वच्छतेपासून ते कामगारांच्या समस्यांबाबत प्रश्न तयार होत गेले. 

मक्तेदार न्यायालयात 
महापालिकेने नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला सफाईचा मक्ता दिला असून, पाच महिन्यांतच तक्रारीवरून हा मक्ता रद्द करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. याबाबत मक्तेदार मक्ता रद्द होऊ नये, यासाठी न्यायालयात गेला असल्याची माहिती आज स्थायी सभेत शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा यांनी दिली. 

शिवसेनेचे सोमवारपासून आंदोलन 
शिवसेनेचे नगरसेवक अनंत जोशी व नितीन बरडे यांनी त्यांच्या वॉर्डातील तसेच शहरातील अस्वच्छतेच्या परिस्थितीवर दहा दिवसांपूर्वी आंदोलन सुरू केले होते. महापालिका प्रशासनाकडून त्यांना आठ दिवसांत शहरातील परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले होते; परंतु परिस्थिती बिकट झाल्याने शिवसेना पुन्हा सोमवारपासून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. 


मागील आठवड्यात शहरातील व आमच्या प्रभागातील अस्वच्छतेच्या प्रश्नावरून महापालिकेसमोर आंदोलन केले. प्रशासनाने आठ दिवसांत शहरातील परिस्थिती चांगली करण्याचे आश्वासन दिले; परंतु आधीपेक्षा बिकट परिस्थिती झाल्याने आम्ही पुन्हा आंदोलन करणार आहोत. सफाई मक्तेदार व महापालिका प्रशासनाचे अधिकारी यांच्यात काहीतरी गौडबंगाल सुरू आहे. 
 अनंत जोशी, शिवसेना गटनेते 

शहरातील कचरा उचलण्याचे काम आम्ही डबल शिफ्टमध्ये सुरू केले असून, एक दिवसाआड 47 घंटागाड्या कचरा संकलनासाठी सध्या सुरू आहेत. एक-दोन दिवसांत अजून वाहनचालकांची संख्या वाढल्यावर घंटागाड्यांची संख्या वाढवून दोन दिवसांत शहरातील कचऱ्याची समस्या कमी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. सफाई मक्तेदार न्यायालयात गेला असून, महापालिकेकडून आम्ही शहरातील सफाईचे नियोजन केले आहे. 
 मिनीनाथ दंडवते, आरोग्य विभाग, महापालिका उपायुक्त 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com