"लॉकडाउन'मध्ये किचन "ऍक्‍टिव्ह मोड'वर... चटपटीत पदार्थांसह "हेल्दी फूड'ला प्राधान्य

"लॉकडाउन'मध्ये किचन "ऍक्‍टिव्ह मोड'वर... चटपटीत पदार्थांसह "हेल्दी फूड'ला प्राधान्य

जळगाव  : सक्तीची सुटी असल्याने बच्चेकंपनी घर डोक्‍यावर घेत आहे. बाहेर जाऊन पाणीपुरी, भेळ, रगडा अन्‌ समोसासह विविध चटपटीत पदार्थांवर ताव मारण्याची संधी मुलांना नाही. त्यामुळे घरात वेगळे पदार्थ करण्यासाठी मुलांचा हट्ट आहे. अर्थात चटपटीत पदार्थांऐवजी पारंपरिक पदार्थांसह "हेल्दी फूड' बनविण्यास गृहिणी प्राधान्य देत आहेत. या काळात घरातील पुरुष मंडळीही आपल्या हातून "रेसिपी' आजमावून पाहत आहेत. 

सध्या संचारबंदी लागू होऊन एक महिना होत आला आहे. मुले घरातच असल्याने त्यांच्या करामतींना पालकांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच पाणीपुरी, कचोरी, भेळ, समोसा, रगडा, आइस्क्रीम अशा चटपटीत व खमंग पदार्थांची आठवणही येणारच. दररोज तीच ती पोळी-भाजी नको, वेगळे काहीतरी हवे, असा मुलांचा आग्रह असतो. त्यामुळे पारंपरिक भारतीय पदार्थ बनविण्याचा सिलसिलाही सुरू आहे. 
वाटाणे, मूग, मटकीची उसळ, उपमा, इडली, थालीपीठ, खमण ढोकळा, पुलाव, शेवयांची खीर, शिवाय सध्या फळेही उपलब्ध आहेत. त्यामुळे फळांचे ज्यूस, सलाडही तयार केले जात आहेत. रोज नवा खाद्यपदार्थ मिळत असल्याने खवय्या मुलांची पोटपूजा जोरात सुरू आहे. 

या पदार्थांची क्रेझ 
बीट, पालक- मेथी पराठे, गाजरचा हलवा, मोड आलेली मटकी, मूग, चवळी, गूळ- शेंगदाणा लाडू, चिक्की, खजूर- खोबरे लाडू, काकडी कोशिंबीर- सलाद, गुळतूप पोळीचा चुरमा; तर पेयांमध्ये कैरीचे पन्हे, कोकम, निंबू सरबत, आवळा सरबत, मसाला दूध, लस्सी, ताक आहे. 


सध्या सुटी असल्याने मुले सारखा हट्ट करतात. रोज काय करावे, असा प्रश्‍न पडतो. पण मुलांसाठी काहीतरी नवीन करावेच लागते. पाले- भाज्यांचे थालीपीठ बनवून देत आहे. 
 सुचित्रा पाटील, चाळीसगाव 

घरात मुलांची नेहमीच फर्माईश असते. दररोज काहीतरी चांगले पाहिजे, असा हट्ट असतोच. सकाळचा नाश्‍ता, दुपारचे जेवण करताना वेळ जातोच. कडधान्याच्या नवीन उसळीचे प्रकार, पुलाव करत आहे. 
 भारती चौधरी, जळगाव 

सध्या सुटी असल्याने मुले घरातच आहेत. रोजच कोणते पदार्थ करावे, असा पेच पडतो. पोळी- भाजी खायला तयार नसतात, तेव्हा केकचे विविध प्रकार, बालूशाही, जिलेबी, समोसा व शेव असे पदार्थ करावेत, अशी मागणी असते. 
प्रतिभा तावडे, वरणगाव 

लहान मुलांना पदार्थ देताना गरम तेलकट आणि आंबट देऊ नये. ज्या पदार्थांमधून प्रथिने व जीवनसत्व मिळतात असेच पदार्थ द्यावेत. 
दुधाचे पदार्थ, ताक, रवा - बेसन लाडू तसेच गहू, तांदूळ आदींपासून तयार केलेले पदार्थ दिले पाहिजेत. 
 डॉ. रूपाली बेंडाळे, स्त्रीरोग तथा विशेष आहारतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com